|
वॉशिंग्टन (अमेरिका) – डॉनल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली. यात प्रसिद्ध उद्योगपती आणि ट्रम्प यांचे सहकारी इलॉन मस्क यांनीही भाग घेतला. हे संभाषण २५ मिनिटे चालल्याचे सांगण्यात आले. ट्रम्प यांनी झेलेंस्की यांना रशियासमवेत चालू असलेल्या युद्धात साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. ट्रम्प यांनी झेलेंस्की यांना सांगितले की, त्यांना मुत्सद्देगिरीला आणखी एक संधी द्यायची आहे. मी वचन देतो की, तुम्ही माझ्याकडून निराश होणार नाही.
यानंतर ट्रम्प यांनी मस्क यांना दूरभाष दिला. मस्क झेलेंस्की यांच्याशी बोलले. युक्रेनला इंटरनेट पुरवल्यासाठी झेलेंस्की यांनी मस्क यांचे आभार मानले. वर्ष २०२२ मध्ये युद्ध चालू झाल्यानंतर रशियाने युक्रेनमधील दळणवळण यंत्रणा नष्ट केली. तेव्हापासून मस्क यांची स्टारलिंक प्रणाली युक्रेनमध्ये इंटरनेट सेवा पुरवत आहे.
तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याशीही झाली चर्चा !
याआधी तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी डॉनल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी मस्क यांचा मुलगाही त्यांच्यासमवेत होता. एर्दोगन म्हणाले की, त्यांनी ट्रम्प यांना मध्यपूर्वेतील युद्ध थांबवण्याचे आवाहन केले होते. मस्क यांच्याशी संभाषण झाले कि नाही ?, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.