Andhra Pradesh Hindus Temples : मंदिरांच्या वैदिक परंपरा आणि चालीरिती यांचे पावित्र्य राखा ! – आंध्रप्रदेश सरकारचा खातेप्रमुखांना आदेश

मंदिराचे पावित्र्य राखण्यात अडथळा न आणण्याचाही आदेश

अमरावती (आंध्रप्रदेश) – ‘आंध्रप्रदेश धर्मादाय आणि हिंदु धार्मिक संस्था कायदा, १९८७’च्या कलम १३ (अ) च्या अंतर्गत ‘वैदिक परंपरांच्या प्रकरणांमध्ये मंदिरांना स्वायत्तता सुनिश्‍चित करा आणि मंदिरांच्या चालीरिती अन् परंपरा यांचे पावित्र्य राखण्यामध्ये कुठलेच अडथळे आणू नका’, असा आदेश आंध्रप्रदेश सरकारने सर्व खातेप्रमुखांना दिला. या आदेशाचे पालन करून त्याविषयीचा अनुपालन अहवाल सादर करण्यासही सरकारने सांगितले आहे.

१. मंदिरांवर प्रशासकीय नियंत्रण असणारे आयुक्त, विभागीय सहआयुक्त, उपायुक्त किंवा साहाय्यक आयुक्त यांपैकी कुठल्याही प्रशासकीय अधिकार्‍याने मंदिरांच्या वैदिक परंपरा आणि चालीरिती यांमध्ये हस्तक्षेप करू नये.

२. मंदिरांतील देवतांचे धार्मिक विधी, सेवा, कुंभाभिषेक, तसेच इतर धार्मिक उत्सव यांविषयी निर्णय घेतांना मंदिरांतील वरिष्ठ पुजारी आणि धार्मिक सेवेकरी यांचे मत ग्राह्य धरावे. यासाठी आवश्यकता वाटल्यास कार्यकारी अधिकारी हे वरिष्ठ पुजारी आणि धार्मिक सेवेकरी यांची एक वैदिक समिती  स्थापन करू शकता. याविषयी मतभेद असल्यास पिठाधिशांचे मत विचारात घेऊ शकता.

३. देवतांची सेवा आणि धार्मिक विधी यांमध्ये कार्यकारी अधिकार्‍यांनी हस्तक्षेप करू नये. या प्रकरणी धर्मादाय विभागाच्या आयुक्तांनी आवश्यक कारवाई करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.