भ्रमणभाषवरून येणार्‍या फसव्या संपर्कापासून सावध रहा आणि आर्थिक हानी टाळा !

साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांच्यासाठी सूचना !

प्रतिकात्मक छायाचित्र

गेल्या काही महिन्यांपासून ‘ऑनलाईन’ वा भ्रमणभाषद्वारे होणार्‍या फसवणुकीच्या घटनांविषयी ‘सनातन प्रभात’ मधून वेळोवेळी सूचना  प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.  या अपप्रकारांविषयी सर्वांमध्ये सतर्कता वाढावी, या उद्देशाने एका धर्मप्रेमींना आलेल्या फसव्या संपर्काची (कॉलची) घटना येथे देत आहोत.

एका धर्मप्रेमींना शर्मा नावाच्या एका अनोळखी व्यक्तीने भ्रमणभाषवर संपर्क करून  सांगितले, ‘‘मला माझ्या मित्राला तात्काळ १५ सहस्र रुपये पाठवायचे आहेत; मात्र माझ्या बँक खात्यातून मित्राच्या खात्यात रक्कम हस्तांतर (ट्रान्स्फर) होत नाही. कृपया तुम्ही माझ्या मित्राला १५ सहस्र रुपये पाठवा. मी तुम्हाला तुमच्या खात्यात १५ सहस्र रुपये पाठवतो.’’ या वेळी धर्मप्रेमींना संशय आल्याने त्यांनी ही रक्कम पाठवायचे टाळले. त्या वेळी त्या व्यक्तीने सांगितले, ‘‘मी तुम्हाला आधी १५ सहस्र रुपये पाठवतो. त्यानंतर तुम्ही माझ्या मित्राला रक्कम पाठवा.’’ २-३ मिनिटांनी त्या व्यक्तीने पुन्हा धर्मप्रेमींना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मी तुमच्या व्हाट्सॲपला रक्कम पाठवली आहे आणि रक्कम जमा केल्याचा ‘स्क्रीन शॉट’ (भ्रमणभाषवरील रक्कम जमा केल्याच्या पावतीचे चित्र) पाठवला आहे. तो तुम्ही पहा आणि मी एक भ्रमणभाष क्रमांक देतो, त्यावर तुम्ही रक्कम पाठवा.’’ या धर्मप्रेमींनी भ्रमणभाषवर तो स्क्रीनशॉट पाहिला असता जशी बँकेकडून ऑनलाईन पावती येते, तशाच प्रकारची पावती आली होती. या वेळी धर्मप्रेमींच्या लक्षात आले की, पावती आली, तरी रक्कम जमा झाल्याचा कोणताही संदेश बँकेकडून धर्मप्रेमींना आला नव्हता. त्यामुळे त्या धर्मप्रेमींनी सतर्क राहून त्या व्यक्तीला अशी कोणतीही रक्कम जमा झाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने धर्मप्रेमींशी होत असलेले संभाषण तिथेच थांबवून पुन्हा संपर्क केला नाही.

सध्या अशा प्रकारचे फसवे संपर्क करून तुमच्या बँक खात्यातील रक्कम काढण्याच्या विविध क्लृप्त्या ‘सायबर गुन्हेगारां’कडून वापरल्या जाऊन अनेक नागरिकांची लाखो रुपयांची हानी होत असल्याच्या घटना घडत आहेत. हे लक्षात घेता साधक, धर्मप्रेमी, वाचक, हितचिंतक यांना अशा प्रकारे भ्रमणभाषवर कुणी संपर्क केल्यास त्याला कोणताही प्रतिसाद देऊ नये.