आपण कर्तव्य करून फळ रामावर सोपवावे !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) एखाद्याचा दोष चारचौघात दाखवत; पण तो असा खुबीने दाखवत की, त्या माणसाचे मन दुखावले जात नसे. मन ही भगवंताची विभूती असल्याने मन दुखावणे, म्हणजे भगवंताला दुखावणे होय. ‘साधकाने दुसर्‍याचे मन कदापि दुखावू नये’, असे श्रीमहाराज म्हणत. एका माणसाचा मुलगा २० वर्षांचा झाला, तरी काही उद्योगधंदा करत नव्हता. अभ्यासातही त्याचे लक्ष नव्हते. त्यामुळे त्याच्या आईला मानसिक त्रास होत असे. श्रीमहाराजांनी एका सज्जन अधिकार्‍यास सांगून त्या मुलास एका कारखान्यात नोकरी लावून दिली. काही दिवसांनी त्या मुलाने नोकरी सोडली. कारखान्याचे मालक त्या अधिकार्‍यास म्हणाले, ‘मुलगा न सांगताच कारखाना सोडून निघून गेला. जातांना थोडेसे गुणही उधळून गेला. असा मुलगा तुम्ही आम्हाला द्यायला नको होता.’ त्यांचे हे शब्द त्या अधिकार्‍याच्या मनास लागले. ‘यापुढे कुणालाही नोकरीस लावायच्या भानगडीत पडायचे नाही’, असे त्यांनी ठरवले. ‘नाहक आपला अपमान झाला’, असे त्यांना वाटले. लवकरच त्यांची श्रीमहाराजांशी गाठ पडली, तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, ‘समजा आपण एखादा मोठा बंगला बांधला आणि त्यात बागबगीचा करण्यासाठी अन् फुलझाडे लावण्यासाठी एक माळी नेमला. माळ्याने बरीच फुलझाडे लावली. त्यातली काही मेली. तेव्हा तो मनाने विष्ण्ण झाला आणि ‘यापुढे झाडेच लावायची नाहीत’, असा हट्ट मनात धरून बसला, तर हे त्याचे करणे कितपत शहाणपणाचे होईल ? फुलझाडे लावणे, हे त्याचे काम असते. ते त्याने करावे. जी मरतील त्यांच्याविषयी दुःख मानू नये. जी येतील ती भगवंताच्या कृपेने आली, असे मानावे.’ श्रीमहाराज यांच्या या शब्दांनी ते अधिकारी एकदम विषण्णतेतून बाहेर आले.

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक – ल.ग. मराठे)