संपादकीय : ‘जंगली रमी’तून समाज घडेल का ?

‘जंगली रमी’ चे विज्ञापन

सध्या भारतात ‘जंगली रमी’ या ‘ऑनलाईन’ जुगारसदृश खेळाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वाेच्च न्यायालयाने या ऑनलाईन खेळांना ‘कौशल्याचा खेळ’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘हा जुगार नाही’, असे म्हणून या जुगारसदृश खेळाला मोकळे रान मिळाले आहे. सद्यःस्थितीत भारतात जंगली रमीचे ८ कोटींहून अधिक खेळाडू आहेत. दिवसेंदिवस हा खेळ खेळणार्‍यांची संख्या कमालीची वाढत आहे. १ ते ३१ ऑक्टोबर या एका महिन्याच्या काळात या ऑनलाईन खेळातून ३८ कोटी रुपयांहून अधिक बक्षिसांचे वाटप करण्यात आल्याची माहिती या ॲपच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ५ लाख ते २५ लाख रुपयांची बक्षिसे असलेल्या स्पर्धा घोषित करण्यात आल्या आहेत. यातून पुढील काही कालावधीत हा जुगारसदृश खेळ खेळणार्‍यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या खेळाची व्याप्ती अशीच वाढत राहिली, तर येत्या काही वर्षांत अनेक युवकांना या जुगाराचे व्यसन लागेल.

हा खेळ झपाट्याने वाढण्याचे कारण म्हणजे प्रसिद्ध क्रिकेटपटू, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार यांना ‘जंगली रमी’च्या विज्ञापनात दाखवण्यात आले आहे. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा मोठा भरणा आहे. एखाद्या हिंदी चित्रपटाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्यानंतर काही दिवसांमध्येच त्या चित्रपटातील नायक आणि नायिका ‘जंगली रमी’च्या विज्ञापनात दिसून येतात. यावरून या जुगारसदृश खेळातून किती माया (पैसा) गोळा होत असेल, याचे अनुमान लावता येईल. प्रथितयश कलाकारांना कोट्यवधी रुपये देऊन त्यांना विज्ञापनात घेतले जाते. या कलाकारांचे कोट्यवधी चाहते त्यांचे अनुकरण करतात. यामुळे ‘जंगली रमी’मध्ये युवावर्ग आपोआप ओढला जात आहे. एक काळ असा होता की, वृत्तपत्रांमधील जुगाराचे आकडे चोरून पाहिले जायचे. अधिक पैसे मिळत असले, तरी लोकलज्जेस्तव का होईना, प्रथितयश वृत्तपत्रे जुगाराचे आकडे प्रसिद्ध करायला कचरत होती. सद्यःस्थितीत मात्र ‘जंगली रमी’सारख्या जुगारसदृश खेळाला जनाधार आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे पाप युवा पिढी स्वत:चे आदर्श समजत असलेले आघाडीचे चित्रपट कलाकार करत आहेत. त्यामुळे या जुगारसदृश ‘जंगली रमी’ची विज्ञापने वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांसह सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात येणे नित्याचेच झाले आहे.

‘जंगली रमी ॲप’च्या संकेतस्थळावर त्यांच्या सर्वाधिक रक्कम विजेत्यांचा प्रतिक्रिया छायाचित्रासह प्रसारित करण्यात येतात. त्यांनी जिंकलेल्या रकमा कोट्यवधी रुपयांच्या घरात आहेत. हेही युवा वर्ग ‘जंगली रमी’कडे आकर्षित होण्याचे कारण आहे. यामुळे सद्यःस्थितीत खासगी आस्थापनांमध्येच नव्हे, तर शासकीय कार्यालयांमध्येही फावल्या वेळेत कर्मचारी ‘जंगली रमी’ खेळत बसलेले पहायला मिळतात. यामध्ये पोलीसही मागे राहिलेले नाहीत. ‘जंगली रमी’च्या विज्ञापनाच्या शेवटी ‘या खेळाचे व्यसन लागू शकते. त्यामुळे जबाबदारीने खेळा’, अशी टीप दिली जाते. ज्याप्रमाणे सिगारेटच्या पाकिटावर ‘सिगारेट पिण्यामुळे कर्करोग होऊ शकतो’, हे छायाचित्रासह प्रसिद्ध केले जाते, त्याचप्रमाणे ‘जंगली रमी’च्या विज्ञापनात ‘व्यसन लागू शकते’, ही औपचारिकता केली जाते. हे पाहूनही जी मंडळी ‘जंगली रमी’ खेळतात, त्यांना व्यसनच लागलेले असते.

महसुलापेक्षा भवितव्य महत्त्वाचे !

‘जंगली रमी’मधून झटपट पैसा मिळत असेल, तर त्यात वावगे काय ?’, असे काहींना वाटू शकते; परंतु झटपट मिळणार्‍या पैशांतून व्यक्ती वाममार्गाला लागण्याची शक्यता अधिक असते आणि सध्या या जुगारसदृश खेळाशी जोडलेल्या नागरिकांमध्ये युवा वर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे देशाची भावी पिढी यामध्ये व्यसनाधीन होणे, हे देशाला परवडणारे नाही. सद्यःस्थितीत ८ कोटी खेळाडू असून ही संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ते पहाता येत्या काही वर्षांत देशातील कोट्यवधी युवक-युवती या खेळात अडकण्याची भीती आहे. एका ऑनलाईन जुगाराच्या विज्ञापनात तर बेरोजगार मुलाला त्याचे वडील नोकरीविषयी विचारतात, तेव्हा तो ‘ऑनलाईन जुगारातून पैसे कमवत आहे’, असे सांगतो आणि ते ऐकून वडील खुश होतांना दाखवले आहे. यातून युवकांची क्रियाशक्ती या जुगारसदृश खेळामध्ये वाया जात असल्याचे दिसून येते. अर्थार्जन असे हवे की, त्यातून देशाची प्रगती होईल. जुगारातून मिळालेला पैसा जसा व्यक्तीला कुमार्गावर नेऊ शकतो, तसा जुगारातून मिळणारा महसूलही देशाला अधोगतीला नेईल. त्यामुळे ‘जंगली रमी’मधून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो, म्हणून या जुगारसदृश खेळाला मोकळे रान देणे, हे सामाजिकदृष्ट्या धोकादायक आहे.

सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सरकारची भूमिका मद्य, जुगार, अमली पदार्थ आदींना प्रतिबंध घालणारी असायला हवी. अन्य व्यवसायाच्या तुलनेत मद्यालये, जुगार यांतून मिळणारा महसूल अनेक पटींनी अधिक असतो. कोरोना महामारीच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प झाला असतांना मद्याच्या विक्रीतून अर्थव्यवस्था सावरली गेली, असा प्रचार (प्रपोगंडा) निर्माण केला गेला. सद्यःस्थितीत तर मद्याच्या विक्रीचे नियमन करण्यासाठी सर्वच राज्यांमध्ये स्वतंत्र उत्पादन शुल्क विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागाचे काम मद्याच्या विक्रीवर कर आकारणे, कर गोळा करणे, अवैध प्रकार रोखणे यांपुरते मर्यादित असणे आवश्यक होते. सध्या मात्र हा विभाग मद्यातून अधिकाधिक कर गोळा होण्यासाठी अधिकाधिक उद्दिष्ट घालून देतो. मद्यातून महसूल मिळाला, तर तो विकासकामांसाठी वापरता येईल, असा मुलामाही त्याला लावला जातो. विकास काय आताही चालूच आहे; पण नैतिकता शिल्लक राहिलेली नाही आणि नैतिकता नसलेला विकास समाजाला यांत्रिकतेकडे घेऊन जात आहे. त्यामुळे सरकारने महसुलाच्या मागे न लागता जुगारसदृश ‘जंगली रमी’सारखा खेळ वेळीच नियंत्रित करावा. त्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक तो पालट करावा. शेवटी नैतिकता राहिली, तर आर्थिक प्रगतीला अर्थ राहील. पतीव्रता होऊन स्त्रीत्व जपणे, हे कोणत्याही महिलेला आदरास पात्र बनवते. त्याप्रमाणे ऑनलाईन रमीसारख्या व्यभिचारी मार्गाचा अवलंब करून अर्थार्जन करण्याचा मार्ग युवकांनी चोखाळण्यापेक्षा युवा वर्गाने कष्ट करून बुद्धीमत्ता समाज आणि राष्ट्र कार्यासाठी खर्ची घालण्यासाठी त्यांना उद्युक्त करण्याचे दायित्व पालक म्हणून सरकारचे आहे. शेवटी ‘जंगली रमी’सारख्या ऑनलाईन जुगारातून समाज घडेल कि बिघडेल ? याचा विचार सरकारने करायलाच हवा. महसुलापेक्षा समाज घडणे महत्त्वाचे आहे, हे सरकारने वेळीच लक्षात घ्यावे आणि ‘जंगली रमी’सारख्या ऑनलाईन जुगारांना वेळीच नियंत्रित करावे !

‘महसुलापेक्षा समाज घडणे महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घेऊन सरकारने ऑनलाईन जुगार वेळीच नियंत्रित करावा !