देवस्थानातील इतर धर्मीय कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करणार ! –  New TTD Board Chairman BR Naidu

आंध्रप्रदेश सरकारने नवीन तिरुमला तिरुपती देवस्थानम् बोर्डाची केली घोषणा !

तिरुमला तिरुपती देवस्थानम् बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष बी.आर्. नायडू (वर्तुळात)

तिरुमला (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश सरकारने नवीन तिरुमला तिरुपती देवस्थानम् बोर्डाची घोषणा केली. यांतर्गत बोलिनानी राजगोपाल (बी.आर्.) नायडू यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. नवीन मंडळात कर्नाटकातील ३, तेलंगाणातील ५, तमिळनाडूचे २, तर गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांतील प्रत्येकी १ सदस्य आहे. नवनियुक्त अध्यक्ष नायडू यांनी पदभार स्वीकारतांना सांगितले की, ‘इतर धर्मांच्या लोकांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.’ याचा अर्थ तिरुपती मंदिरात काम करणार्‍या इतर धर्मीय कर्मचार्‍यांना नोकरीतून लवकरच काढून तेथे हिंदु कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे, असे म्हटले जात आहे.

बी.आर्. नायडू म्हणाले की, देवस्थानम्च्या अध्यक्षपदी नियुक्ती मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी याला माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ मानतो. आधीच्या सरकारने देवस्थानात खूप चुका केल्या. मी ५ वर्षांत एकदाही तिरुमलाला भेट दिली नाही; कारण मला वाटले की, तेथे पवित्रता नाही. पूर्वी मी वर्षातून ५-६ वेळा तिरुमलाला जायचो. मी या सूत्रांवर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली आहे. माझा हेतू केवळ काम करण्याचा आहे, काहीही साध्य करण्याचा माझा हेतू नाही. तिरुमला येथे काम करणार्‍या इतर धर्मांच्या लोकांविषयी मी सरकारशी चर्चा करीन, त्यांना इतर विभागात पाठवायचे कि स्वेच्छानिवृत्ती द्यायची, हे ठरवीन.