कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाख माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी पत्रलेखनातून केले पालकांना मतदानाचे आवाहन !

विद्यार्थ्यांनी पालकांना मतदानाचे आवाहन करणारी लिहिलेली पत्रे

कोल्हापूर – महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. या निमित्ताने अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदार जनजागृतीचा कार्यक्रम चालू आहे. या अंतर्गत पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखनाचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील सुमारे ३ सहस्र प्राथमिक आणि सुमारे २ लाख ५१ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांना मतदानाचे आवाहन करणारी पत्रे लिहून घेऊन ही पत्रे पोष्टाद्वारे पाठवण्यात आली आहेत. (जे प्रत्यक्ष मतदार नाहीत, असे विद्यार्थी मतदान करण्यासाठी पत्रे लिहितात आणि ज्यांनी मतदान करणे अपेक्षित आहे, त्यांच्यात मात्र मतदान करण्याप्रती निरुत्साह जाणवतो, ही लोकशाहीची शोकांतिका नाही का ?- संपादक)

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कापड व्यापारी, गोड खाऊ विकणारी दुकाने, भेटवस्तूंची दुकाने, ‘मोबाईल शॉपी’ यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे दीपावली सणानिमित्त खरेदीसाठी येणार्‍या लोकांना ‘स्टिकर्स’द्वारे मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे. स्टिकर्सवर मतदारांना त्यांच्या मतदार सूचीतील नाव शोधणे सुलभ व्हावे, यासाठी ‘क्यू आर् कोड’द्वारे सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनुमाने १ लाख ‘स्टिकर्स’चे वाटप करण्यात आले आहेत.

‘स्वीप’च्या माध्यमातून ५ नोव्हेंबरला ‘सायकल फेरी’ आयोजित करण्यात आली आहे. ही फेरी एकाच वेळी कोल्हापूर शहर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, पन्हाळा आणि गारगोटी या ठिकाणी होईल. तरी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.