कोल्हापूर – विभागीय कार्यालय क्रमांक १ अंतर्गत ‘रचनाकार हौसिंग सोसायटी’ येथील देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्याचा ठेकेदार कृष्णा खाडे याला १ वर्षासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी काळ्या सूचीत टाकले आहे. ठेकेदाराने महापालिकेची नोटीस न स्वीकारणे, महापालिकेस कामाविषयी प्रतिसाद न देणे, रस्ते सुस्थित असण्याविषयी खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याविषयी ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्यांचा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ३० ऑक्टोबरला आयुक्त कायालयात आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले.
जी कामे संमत करून बरेच दिवस होऊन आचारसंहितेपूर्वी कामाचे आदेश दिलेले नाहीत, अशा कामांच्या धारिका कुठे प्रलंबित आहेत ? याची पडताळणी करा. यात ज्या कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ अभियंता, उप-शहर अभियंता, शहर अभियंता यांच्याकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनास येईल, त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना दिल्या. आरोग्य आणि रस्त्यांविषयी नागरिकांच्या अधिक तक्रारी असून त्या विभागीय कार्यालय स्तरावरच निर्गत झाल्या पाहिजेत, असे आदेश प्रशासकांनी या वेळी दिले.