निवडणूक विशेष !
निवडणुकीसाठी राज्यात ७ सहस्र ९९५ उमेदवार रिंगणात !
मुंबई – येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष यांच्या ७ सहस्र ९९५ उमेदवारांनी १० सहस्र ९०५ नामनिर्देशन पत्रे भरली आहेत. ३० ऑक्टोबर या दिवशी सर्व नामनिर्देशन पत्रांची पडताळणी होणार आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. २० नोव्हेंबर या दिवशी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर या दिवशी निकाल घोषित होईल.
महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांच्या ८ सभा
मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या ८, गृहमंत्री अमित शहा यांच्या २०, मंत्री नितीन गडकरी यांच्या ४०, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५०, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या ४०, तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या १५ सभा नोव्हेंबर महिन्यात होतील.
अमित ठाकरे यांची स्टेट बँकेत १०७ खाती
मुंबई – अमित ठकारे यांच्या प्रतिज्ञापत्रात दादर येथील स्टेट बँकेत १०७ खाती असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नावावर १२ कोटींहून अधिक संपत्ती आहे. दीड कोटींहून अधिक स्थावर मालमत्ता आहे. १ लाखांहून अधिक रोकड आहे. त्यांच्याकडील समभाग, सोने, पोस्ट आणि अन्य ठिकाणच्या ठेवी यांचाही यात उल्लेख आहे. त्यांचा ‘ऑपरेशन आँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह’ असा व्यवसाय असल्याचेही त्यात म्हटले आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या नावावरील संपत्तीचाही यात उल्लेख आहे.
मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही !- देवेंद्र फडणवीस
मुंबई – मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी केलेल्या विधानाने आता महायुतीमध्ये भाजपचा कि शिवसेनेचा मुख्यमंत्री याविषयी मोठा प्रश्न उभा रहाणार आहे. मी ५ वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात केवळ २ मुख्यमंत्र्यांनाच ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे. मला जे दायित्व देण्यात येईल, ते स्वीकारून मी काम करीन, असेही ते या वेळी म्हणाले.
पालघर येथे ४ कोटी रुपयांची रोकड जप्त
पालघर – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. नाकाबंदीच्या वेळी पालघर जिल्ह्यातील उधवा येथे पोलिसांनी ४ कोटी २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. तपासणी नाक्यावर तलासरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रोख रक्कम आणि रोकड वाहतूक होत असलेली व्हॅन पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणी अधिक अन्वेषण तलासरी पोलीस करत आहेत.