पुणे – शहरांमध्ये विविध ठिकाणी विनाअनुमती फटाकेविक्रीची दुकाने उभी राहिली आहेत. त्याविषयी नागरिकांकडून तक्रारी येऊ लागल्याने पोलिसांनी अशा फटाके विक्री करणार्या दुकानांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. विमानतळ पोलिसांनी ४ फटाका विक्रेत्यांच्या वरोधात गुन्हे नोंद केले आहेत. शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये वर्तक बाग, गोळीबार मैदान परिसरांमध्ये फटाके विक्रीची दुकाने आहेत. तेथील विक्रेत्यांना अनुमती दिली जाते. फटाक्यांच्या दुकानांना अग्नीशमनदल, महापालिका, पोलिस यांच्याकडून अनुमती घ्यावी लागते. त्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करणे आवश्यक असते.
नगर रस्त्यावरील ‘फिनिक्स मॉल’जवळील फटाके विक्रीच्या दुकान चालकावर विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. लोहगावमधील संतनगर परिसरातील, भाजी मंडई परिसरातील विनाअनुमती फटाका विक्रेत्यांवर गुन्हे नोंद केले आहेत.
परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव म्हणाले, ‘‘रहिवासी भागात फटाके विक्रीच्या दुकानांमध्ये आग लागल्यास दुर्घटना घडू शकते. विनाअनुमती फटाका विक्री दुकाने आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी.’’
जप्त केलेले फटाके पोलीस ठाण्यात नको !
फटाके जप्त करून पोलीस ठाण्यात ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे पोलिसांनी फटाके जप्तीपेक्षा थेट दुकानमालकांना समज देऊन फटाक्यांसह दुकान काढण्याचे आदेश दिले आहेत.
संपादकीय भूमिका :अशा फटाका विक्रेत्यांवर पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? नागरिकांकडून तक्रारी येण्याची वाट का पहात असतात ? |