तिलारी घाटात पकडलेल्या ट्रकमध्ये होते १० टन गोमांस : २ जणांवर गुन्हा नोंद

भाजीपाल्याच्या गोण्यांच्या आडून चालू होती गोमांसाची तस्करी

दोडामार्ग – तिलारी घाटातून गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक स्थानिक ग्रामस्थांनी २८ ऑक्टोबर या दिवशी पकडला होता. या ट्रकमध्ये १५ लाख रुपये किमतीचे १० टन गोमांस, ७ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ४ लाख रुपये किमतीची चारचाकी (कार), असा मुद्देमाल पोलिसांनी कह्यात घेतला आहे. या प्रकरणी सय्यद इस्माईल सय्यद अलाउद्दीन मिरचोणी (रहाणार पेडामळ, केपे, दक्षिण गोवा) आणि अमोल विद्याधर मोहनदास (सह्याद्रीनगर, बेळगाव) या दोघांवर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२८ ऑक्टोबर या दिवशी बेळगाव येथून गोव्याला जाणारा ट्रक तिलारी घाटात बंद पडला. या घाटातून अवजड वाहतुकीस बंदी असतांना हा ट्रक कसा आला ? याची विचारणा करण्यास काही स्थानिक ग्रामस्थ गेले होते. तेव्हा त्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता भाजीच्या गोण्यांखाली गोमांस ठेवलेले निदर्शनास आले. त्यामुळे गोमांसाची तस्करी करणार्‍यांचे बिंग फुटले.

या घाटाच्या प्रारंभी पोलीस तपासणीनाका असतांना असतांना, तसेच निवडणूक आयोगाचे स्थिर सर्वेक्षण पथक कार्यरत असतांना अवजड वाहने घाटातून पुढे जातातच कशी ? असा प्रश्न संतप्त ग्रामस्थ आणि गोप्रेमी यांनी उपस्थित केला आहे. या घटनेतील ट्रक पोलिसांनी चंदगड पोलीस ठाण्यात नेऊन उभा केला आहे.