हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा प्रश्न
मुंबई – तथाकथित पर्यावरणप्रेमी, पुरोगामी आणि नास्तिकतावादी केवळ दिवाळी आली की फटाक्याने प्रदूषण होत असल्याची आवई उठवतात. हिंदूंची महाशिवरात्री आली की दूध वाया जात असल्याची टीका करतात; मात्र हे पुरोगामी बकरी ईदच्या वेळेस रक्ताचे पाट वहातात, त्या वेळेस बोलत नाहीत ?; ख्रिसमस, ३१ डिसेंबरला प्रदूषण होते, त्या वेळी बोलत नाहीत ?; अन्य कार्यक्रमांच्या वेळी होणारे प्रदूषण वा अन्न-धान्याची नासाडी यांविषयी काही बोलत नाहीत. ही दुटप्पी आणि दुतोंडी भूमिका का घेतली जाते ? केवळ हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणे आम्हाला मान्य नाही. दिवाळीच्या फटाक्यांनी प्रदूषण होते, अशी ओरड करणारे ढोंगी पर्यावरणप्रेमी आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले वर्षभर कुठे असतात ?, असा थेट प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यसंघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात वर्षभर कोट्यवधी लिटर अतीदूषित पाणी आणि ८ सहस्र टन घनकचरा कुठलीही प्रक्रिया न करता सर्व महानगरपालिकांकडून नैसर्गिक जलस्रोतात सोडला जातो. त्या प्रदूषणाविषयी कुणी का बोलत नाही ? अनेक पशूवधगृहांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रक्तमिश्रित पाणी सोडले, तरी त्याविषयी बोलले जात नाही; परंतु हिंदूंचे सण आले की जाणीवपूर्वक प्रदूषणाची ओरड केली जाते. यातून तथाकथित पुरोगाम्यांमध्ये पर्यावरणाविषयी किती वरवरचा कळवळा आहे, हे दिसून येते. मागे ‘आवाज फाउंडेशन’ने उच्च न्यायालयात दिवाळीतील ध्वनीप्रदूषणाविषयी याचिका केली होती; मात्र यंदा दिवाळीच्या ध्वनीप्रदूषणामध्ये आवाज अल्प झालेला असल्याने त्याविषयी समाधान व्यक्त केले; परंतु हे ‘आवाज फाउंडेशन’ असेल किंवा काही पुरोगामी स्वयंसेवी संस्था असतील अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या काळात हे कुठल्या बिळात जाऊन लपलेल्या असतात ? अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘फटाक्यांनी होणारे प्रदूषण टाळा’, असे आवाहन केले आहे; मात्र बकरी ईदच्या वेळेत काही पर्यावरणप्रेमींनी ‘मातीची बकरी करून कापणार आहात का ?’, असे आवाहन केल्यावर त्या वेळेस मात्र अंनिसवाल्यांनी लोकांना ज्ञान पाजाळत ‘अन्य धर्मियांच्या भावनांचा विचार केला पाहिजे’, अशी भूमिका घेतली. एकूणच यांचे पर्यावरणाविषयी जागृती आणि प्रेम हे ढोंगी आहे. त्याविषयी त्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे.
हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी फटाक्यांच्या संदर्भातली मोहीम राबवलेली आहे. त्यात ‘श्री लक्ष्मी फटाका’, ‘श्री गणेश फटाका’, ‘नेताजी फटाका’ असे देवता-राष्ट्रपुरुषांची चित्र असलेले फटाके फोडू नयेत, यासाठी जनजागृती केली. पोलीस तसेच दुकानदारांना निवेदन देऊन आवाहन केले आहे. कित्येक दुकानदारांनी समितीच्या प्रबोधनानंतर फटाके ठेवणे बंद केले. लोकांमध्ये पालट दिसत आहे; तसेच केवळ दिवाळी नव्हे, तर होळीला खडकवासला जलाशय रक्षण मोहीम, मशिदींवरील भोंगे, अन्य वर्षभर येणार्या प्रत्येक सणाच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि समिती यांच्या वतीने जनजागृती केली जाते. तशी भूमिका पुरोमागी आणि पर्यावरणप्रेमी घेत नाहीत. ते केवळ हिंदूंच्या उत्सवाला लक्ष्य करतात. अशा तथाकथित पर्यावरणप्रेमींपासून सावध राहिले पाहिजे, असेही श्री. घनवट यांनी या पत्रकात शेवटी म्हटले आहे.
संपादकीय भूमिका :हिंदूंच्या सणांमुळे प्रदूषण होते, हे खोटे कथानक पसरवणारी अंनिस आणि ढोंगी पुरोगामी यांना उघडे पाडण्यास हिंदूंनी पुढे यावे ! |