आळंदी (पुणे) येथील माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये रंगणार ‘दिवाळी पहाट’ !

आळंदी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने ‘दिवाळी पहाट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. माऊलींच्या समाधी मंदिरात दिवाळी पहाट कार्यक्रम २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या समयमर्यादेत साजरा होत आहे. या निमित्ताने आळंदीकरांना नामवंत गायकांच्या स्वरांची मेजवानी ऐकायला मिळाणार आहे.

देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर म्हणाले, ‘‘३१ ऑक्टोबर या दिवशी नरकचतुर्दशीला शरयू दाते यांचे गायन आहे. त्यांना सोहम गोराणे, यश खडके, अविनाश पवार साथ देणार आहेत. १ नोव्हेंबरला लक्ष्मी पूजनादिनी भरत बलवल्ली यांचे गायन होणार, तर त्यांना प्रसाद करंबळेकर, मकरंद कुंडले, दादा परब, घनश्याम बोरकर यांची साथसंगत असेल. २ नोव्हेंबरच्या दिवाळी पाडव्याला मंजुषा पाटील यांचे गायन, रोहित मुजुमदार, सुयेाग कुंडलकर, सुजीत लोहार यांची साथसंगत लाभणार. ३ नोव्हेंबर भाऊबीजेच्या दिनी कृष्णा बोंगाणे, यश खडके, वैभव कडू आदी कलाकारांचे गायन होईल. सर्व कार्यक्रमांना सकाळी ६ वाजता प्रारंभ होईल.