|
म्हापसा, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – गोवा पोलिसांनी २९ ऑक्टोबर या दिवशी कामरखाजन, म्हापसा येथून गायीच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचे सुमारे १५ ते २० डबे कह्यात घेतले आहेत. पोलिसांनी या वेळी चाकू आणि इतर हत्यारेही कह्यात घेतली आहेत. हिंदु तरुणांच्या एका गटाने एका घरावर धाड घालून हा प्रकार उघडकीस आणला. या गटातील अरविंद रेडकर म्हणाले, ‘‘गोव्यात यापूर्वी मडगाव येथेही गायीच्या चरबीपासून बनवलेल्या पदार्थांचे ४५ डबे कह्यात घेण्यात आले होते. या तुपाचा वापर मडगाव येथील अनेक उपाहारगृहांमध्ये केला जात होता.’’ म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी संशयित आप्पालाल बेपारी, मीरासाब बेपारी आणि सैफुद्दीन बेपारी या तिघांना कह्यात घेतले आहे. अनधिकृतपणे गोमांस आणि हाडे यांची साठवणूक केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद
केला आहे.
अरविंद रेडकर पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला म्हापसा येथे तूप बनवले जात असल्याची, त्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि मांस शिजवणे यांसंबंधी काही छायाचित्रे अन् व्हिडिओ मिळाले होते. या माहितीची खात्री करण्यासाठी आमच्या गटाने घरावर धाड घातली. त्या ठिकाणी गायीचे सुकलेले मांस, तुपाने भरलेले डबे आणि काही हत्यारे हाती लागली. मिळालेले सर्व पुरावे संशयास्पद असल्याने याविषयी पोलिसांना माहिती देण्यात आली. या ठिकाणी अनधिकृतपणे गायीचे मांस शिजवून ते वनस्पती तुपाच्या नावाखाली विकले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून घरातील सदस्य एकत्र येऊन घराच्या मागच्या अंगणात हा व्यवसाय करायचे. लोक देवपूजेसाठी या तुपाचा वापर करत होते. आता संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.’’