C295 Aircraft : देशात प्रथमच खासगी आस्थापन वायूदलासाठी विमाने बनवणार

टाटा आस्थापन आणि स्पेन हे वडोदरा (गुजरात) येथे बनवणार ५६ ‘सी-२९५’ विमाने

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

वडोदरा (गुजरात) – देशातील सर्वांत विश्‍वासार्ह उद्योग समूह म्हणून ओळख असलेले टाटा आस्थापन समूह भारतीय वायूदलासाठी विमाने बनवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी येथील ‘टाटा एअरक्रॉप्ट कॉम्प्लेक्स’चे उद्घाटन केले. या संकुलामध्ये ‘सी-२९५’ हे वाहतुकीसाठी विमान बनवण्यात येणार आहे.  भारत आणि स्पेन यांच्यात ५६ विमाने बनवण्याचा करार झाला आहे. त्यातील १६ विमाने स्पेनमध्ये बनवण्यात येणार आहेत. त्यानंतर ४० विमाने ‘टाटा अ‍ॅडवान्स सिस्टम्स लिमिटेड’ हे आस्थापन गुजरातमधील वडोदरा येथे बनवणार आहे.

टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड आस्थापन विमान बनवणारे देशातील पहिले खासगी आस्थापन ठरले आहे. सी-२९५ विमानातून सैनिक, शस्त्रास्त्रेे, इंधन एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी नेता येणार आहे. ही विमाने २ व्यक्ती उडवू शकतात. त्यात ७३ सैनिक किंवा ४८ पॅराट्रूपर्स (पॅराशूटच्या माध्यमांतून विमानातून भूमीवर उडी मारणारे) बसू शकतात, तसेच या विमानावर ८०० किलो वजनाची शस्त्रे बसवता येतील.