Narendra Modi : सायबर धमक्यांना बळी पडू नका ! – पंतप्रधान मोदी

  • पंतप्रधान मोदी यांचे जनतेला ‘मन की बात’मधून आवाहन

  • साहाय्यासाठी ‘१९३०’ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध असल्याची माहिती !

नवी देहली – सध्या अनेक लोकांना भ्रमणभाषवर संपर्क केला जातो आणि त्यांनी काहीतरी गंभीर गुन्हा केल्याचे भासवून त्यांना अटक होऊ शकते, असे सांगून भय दाखवले जाते. अटक होऊ नये, यासाठी त्यांना काही रक्कम अमूक बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जाते. अशा प्रकारे जनतेची फसवणूक करून ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन सायबर गुन्हे केले जात आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून वाचा फोडली. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या धमक्या कुणाला येत असतील, तर सर्व नागरिकांनी ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ या मंत्राचा वापर करावा. असे पाऊल उचलले, तर नागरिकांना ‘डिजिटल सुरक्षा’ मिळेल.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, अशा सायबर धमक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सायबर संस्था काम करत आहेत. असे असले, तरी अशा गुन्ह्यांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता हवी. कुठलीही चौकशी करणारी संस्था अशा प्रकारे दूरभाष करून किंवा ‘व्हिडिओ कॉल’ करून चौकशी करत नाही. तुम्हाला अशा प्रकारे कुणाकडून संपर्क करण्यात आला, तर साहाय्यासाठी ‘१९३०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच याविषयीची तक्रार www.cybercrime.gov.in या संकेतस्थळालाही करावी.