सोलापूर जिल्ह्यात प्रथमच वारकरी भवन लोकार्पण सोहळा !
मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – मंगळवेढा येथे संत परंपरा मोठी आहे, तसेच पंढरपूर हे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वारकरी भवन येथे उभारले गेले. भाविक वारकरी मंडळाने, तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वरमाऊली भगरे यांनी चिकाटीने प्रयत्न केले आणि ते भवन माझ्या निधीतून होत असल्याने मला मनस्वी आनंद झाला आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी केले. ते चोखामेळा नगर ग्रामपंचायत अंतर्गत स्थानिक आमदार निधीतून बांधलेल्या वारकरी भवन या वास्तूचे उद़्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. भागवत चवरे महाराज, सरपंच शिवाजी सरगर यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्री संत दामाजी मंदिरापासून संत चोखामेळा नगर येथील वारकरी भवनपर्यंत बाल वारकरी दिंडी काढण्यात आली.