Ganeshotsav Laser Lights : गणेशोत्सवातील लेझर दिव्यांचा तरुणांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम !

‘महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटने’चे केंद्रीय गृह सचिवांना पत्र

नागपूर – १७ सप्टेंबरच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत लेझर दिव्यांचा (लेझर म्हणजे अंधारात वापरला जाणार आणि दूरपर्यंत जाणारा वेगवेगळ्या रंगांचा प्रकाश) वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. यामुळे नेत्रपटलला, म्हणजेच रेटिनाला रक्तस्राव होऊन काही तरुणांना एका डोळ्याने दिसण्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्या. वर्ष २०२३ मध्येही अशा प्रकारच्या तक्रारींत वाढ झाली होती. हे लक्षात घेता ‘महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटने’ने केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहून या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. ‘अमेरिकन नेत्रतज्ञ संघटने’च्या अहवालानुसार ५ मिलि वॅटहून अधिक क्षमतेच्या लेझर दिव्यांमुळे नेत्रपटल खराब होऊन कायमस्वरूपी अंधत्व येण्याची शक्यता असते.

लेझर दिव्यांचा झोत आकाशाकडे असणे अपेक्षित असतांना तो थेट गर्दीवर फिरवला जातोे. थेट डोळ्यांवर आल्यामुळे रक्तस्रावाचा धोका निर्माण होऊन दिसणे अल्प होऊ शकते. ‘लेझर दिव्यांच्या नियमांची कठोर कार्यवाही व्हावी, तसेच लेझरचा झोत आकाशाच्या दिशेने वर असावा’, अशा मागण्या ‘महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटने’चे अध्यक्ष संतोष अग्रवाल आणि सचिव अतुल कठाणे यांनी गृहसचिवांना लिहिलेल्या पत्रात केल्या आहेत.

महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. विनीत अरोरा म्हणाले की,

१. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीतील ‘लेझर बीम’मुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अनेक गणेशोत्सव मंडळांनी रथावर ‘लेझर बीम’चा वापर केला होता. त्याच्या प्रखर झोतामुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या तक्रारी घेऊन अनेक तरुण मागील काही दिवसांत नेत्रविकार तज्ञांकडे येत आहेत.

२. लेझर बीम हा तीव्र प्रकाशझोत असतो. त्याच्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यांतील बाहुली आकुंचन पावते आणि डोकेदुखी चालू होते. अपस्माराचे झटके येण्याचा त्रास असलेल्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो.

संपादकीय भूमिका

डोळ्यांची हानी करणार्‍या लेझर दिव्यांवर बंदीच घालायला हवी !