गणेशभक्तांनो, गणेशोत्सवात चित्रपटातील अश्लील गाण्यांवर नृत्य केल्याने होणारी हानी जाणा आणि भजन अन् अभंग आदी नृत्य प्रकार सादर करून ईश्वरी आनंद मिळवा !

‘शास्त्रात नृत्याचे खरे स्वरूप काय सांगितले आहे ? आणि सध्या गणेशोत्सवात सादर केली जाणारी नृत्ये ही रज-तमप्रधान असून कलेच्या मूळ उद्देशापासून मनुष्याला दूर नेणारी कशी आहेत ?’, याचे विवेचन या लेखात सौ. मनीषा पात्रीकर यांनी केले आहे. त्यांनी या लेखातून आजच्या काळातील उत्सवांमध्ये नृत्याची झालेली दुःस्थिती मांडली आहे.

सौ. मनीषा जयंत पात्रीकर यांचा परिचय

सौ. मनीषा  पात्रीकर

सौ. मनीषा जयंत पात्रीकर या कथ्थक नृत्यांगना आणि नृत्यगुरु आहेत. त्या मूळच्या नागपूर येथील असून सध्या त्या बोरीवली (मुंबई) येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नृत्याचे शिक्षण नागपूर येथील कै. (सौ.) साधना नाफडे यांच्याकडे झाले आहे. त्यांनी कथ्थक नृत्यामध्ये ‘अलंकार’ ही पदवी प्राप्त केली असून त्यांनी अनेक ठिकाणी एकल (सोलो) नर्तनाचे कार्यक्रम केले आहेत. त्या ‘नृत्य निर्झर’ या नृत्यसंस्थेच्या संस्थापिका आहेत.

‘अशा प्रकारचे लेख प्रसिद्ध करून ‘कलेतील सात्त्विकता आणि त्यातील रज-तमयुक्त स्पंदने यांचा अभ्यास कसा करावा ?’, याचे दिशादर्शन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करते.’

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४६ वर्षे), संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.९.२०२४)

१. प्रत्येक कलेचे साध्य ‘मोक्षप्राप्ती’ हे असणे

१ अ. सृष्टी स्वतःच नृत्यमय आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि अन्य समस्त ग्रहसुद्धा तालबद्ध नृत्य करतात. त्यांचा रंगमंच आकाशमंडल आहे, तर सूर्योदय आणि सूर्यास्त ही त्यांच्या ताल (टीप १) अन् लय (टीप २) यांची सम (टीप ३) आणि काल (टीप ४) आहे.

टीप १ – ताल : नियमबद्ध मात्रांचा समूह म्हणजे ताल.

टीप २ – लय : लय म्हणजे गती. दोन मात्रांमधील सारखे धावते अंतर म्हणजे लय.

टीप ३ – सम : तालातील प्रमुख मात्रेस ‘सम’, असे म्हणतात. प्रत्येक तालात समेची मात्रा ही नेहमी पहिली असते.

टीप ४ – काल : तालातील दुसर्‍या प्रमुख मात्रेस ‘काल’, असे म्हणतात. कालाची मात्रा ही तालाच्या दुसर्‍या अर्ध्या भागाची आरंभीची मात्रा असते.

यो नृत्यति प्रहृष्टात्मा भावैरत्यन्तभक्तितः ।
स निर्दहति पापानि जन्मान्तरशतैरपि ।।

अर्थ : जो प्रसन्न चित्ताने, श्रद्धा आणि भक्तीपूर्वक, तसेच आध्यात्मिक भावांसह नृत्य करतो, तो जन्म-जन्मांतरीच्या पापांतून मुक्त होतो.

१ आ. भारताच्या संस्कृतकालीन प्रभृतींनी प्रखर बुद्धीच्या साहाय्याने ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’, या तिन्ही तत्त्वांचा समन्वय साधून त्याचा उपयोग जीवनाच्या पूर्णत्वासाठी करणे : मानवाचे आंतरिक चैतन्य ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’, या सूत्रात बांधले जाते. कलाकार सत्याचा शोध घेत मार्गक्रमण करत असतो. ती अनुभूती जशी सुंदर असते, तशीच कल्याणप्रदही असते; म्हणूनच कला ‘सत्य, शिव आणि सुंदर’ मानली जाते. भारताच्या संस्कृतकालीन प्रभृतींनी (महनीय व्यक्तींनी) त्यांच्या प्रखर बुद्धीच्या साहाय्याने ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’, या तिन्ही तत्त्वांचा समन्वय साधला आणि त्याचा उपयोग जीवनाच्या पूर्णत्वासाठी सौंदर्यपूर्ण पद्धतीने केला अन् वेगवेगळ्या मार्गांनी जनसमुदायासमोर प्रस्तुत केला. तोच वेगवेगळ्या कलांच्या स्वरूपात अनेक स्रोतांत प्रवाहित होतांना दिसतो.

१ इ. सर्व कलांचे प्रयोजन आणि नृत्यकलेचे महत्त्व : या सर्व कलांचे प्रयोजन, म्हणजे मानवी चित्तवृत्तींना आनंदाप्रत नेणे. यांपैकी प्रामुख्याने नृत्यकलेचा विचार केल्यास ‘मानवाच्या संपूर्ण अभिव्यक्तीचे प्रमुख आणि आद्य साधन नृत्य आहे’, असे दिसून येते, म्हणजे नृत्य ही मानवी जीवनातील स्वाभाविक क्रिया असून ती मानवाच्या समवेतच प्रगत होत गेली आणि आज ती शास्त्रशुद्ध स्वरूपात प्रगल्भ अन् समृद्ध अवस्थेत बघावयास मिळते.

१ ई. प्रत्येक कला ‘आत्मरंजन’ आणि ‘लोकरंजन’, या मार्गांनी प्रवाहित होऊन कलाकाराला शेवटी मोक्षप्राप्तीच्या शिखरावर नेत असल्याने ती श्रेष्ठ मानली जाणे : ‘कलेचा जन्म ‘पंचेंद्रियांची जाणीव, सौंदर्यमूलक तत्त्व, मानवाच्या ठायी असलेली जिज्ञासा आणि नाविन्याची आवड’, यांतून झाला आहे’, असेच म्हणावे लागेल. प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती भिन्न असते. त्यामुळे अभिव्यक्तीसुद्धा भिन्न असते. परिणामी एकच विचार व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या पद्धतींनी मांडला जातो. अभिव्यक्तीचे माध्यम आणि प्रस्तुती करण्याची पद्धत वेगळी असली, तरी सर्व कलांचे मूलतत्त्व अन् ध्येय एकच आहे. प्रत्येक कला ‘आत्मरंजन’ आणि ‘लोकरंजन’ या मार्गांनी प्रवाहित होऊन कलाकाराला शेवटी मोक्षप्राप्तीच्या शिखरावर नेऊन सोडते; म्हणून ती श्रेष्ठ मानली जाते.

२. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजकल्याणासाठी सामाजिक स्वरूप प्रदान केलेल्या गणेशोत्सवाची सध्याच्या काळातील दुःस्थिती !

स्वातंत्र्यपूर्व काळात श्री गणेशाचे पार्थिव पूजन केवळ घरातूनच होत असे; मात्र लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या उद्देशाने एकत्र येण्यासाठी त्याला सामाजिक स्वरूप प्रदान केले. ‘स्वातंत्र्योत्तर काळात समाजातील सर्व घटकांचा विकास होईल’, अशा कार्यक्रमांचे आयोजन गणेशोत्सवात होत असे; मात्र गेल्या काही दशकांत चित्रपटांचा प्रभाव वाढल्यामुळे गणेशोत्सवात ‘चित्रपटांतील गाणी प्रस्तुत केली जाणे, त्या गाण्यांवर नृत्य सादर केले जाणे, लावणीसारखे लोकनृत्य अश्लील हावभाव करत सादर केले जाणे’, हे प्रकार पुष्कळ वाढले आहेत. श्री गणेशाच्या आगमनाच्या वेळी किंवा विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश संगीताच्या तालावर विकृत नृत्य करण्यात तरुण पिढी मग्न असते; किंबहुना त्यांचा सहभाग तेवढाच असतो. अशा प्रकारचे ओंगळ नर्तन (नृत्य) आणि वर्तनही समाजाला अत्यंत निम्न पातळीवर घेऊन जाते. यामुळे सामाजिक विकास होणे तर दूरच; पण त्यातून कुठल्याही प्रकारची एकोप्याची आणि मांगल्याची भावनाही निर्माण होत नाही.

३. तालाची (ताल शब्दाची) निर्मिती

शास्त्रीय नृत्याचे आधारभूत अंग म्हणजे ‘ताल.’ शिवाने केलेल्या ‘तांडव’ (टीप ५) या वीररसप्रधान नृत्यातील ‘ता’ हे आद्याक्षर आणि पार्वतीने केलेल्या ‘लास्य’ (टीप ६) या नाजूक अन् सुकुमार नृत्यातील ‘ल’ हे आद्याक्षर घेऊन ‘ताला’ची निर्मिती झाली. मुळातच ताल-लयाश्रित शास्त्रीय नृत्य, हे उच्च प्रतीचे आहे.

टीप ५ – तांडव : जोशपूर्ण आणि आनंदवर्धक नृत्याला ‘तांडव’, असे म्हणतात. ‘भगवान शंकराचे शिष्य तण्डु यांनी हे भरतमुनींना सांगितले; म्हणून याला ‘तांडव’, असे म्हणतात.

टीप ६ – लास्य : जे नृत्य सुकुमार, शृंगाररसपूर्ण आणि कोमल आहे, त्याला ‘लास्य’, असे म्हणतात.

४. शास्त्रीय नृत्यातून नर्तकासह प्रेक्षकांचीही आध्यात्मिक प्रगती होणे आणि त्यातून त्यांना ईश्वरी तत्त्व अनुभवता येणे

जेव्हा शास्त्रीय नृत्य प्रस्तुत केले जाते, तेव्हा नर्तकाची स्वतःची आध्यात्मिक प्रगती तर होतेच आणि त्याच्या समवेत प्रेक्षकांचीही आध्यात्मिक प्रगती होत असते. हे शास्त्रीय नृत्य नर्तक आणि प्रेक्षक यांना एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाते. त्या शास्त्रीय नृत्यकलेतून जी ऊर्जा निघते, म्हणजेच जे ईश्वरीतत्त्व अनुभवण्यास मिळते, ते अवर्णनीय असते आणि त्याचा आनंद दैवी असतो. त्यामुळे तेथे ईश्वरी तत्त्व जागृत होते. परिणामी या नृत्यातून एकूणच वातावरण मंगलमय आणि पवित्र असे होते. आपण भाग्यवान आहोत; कारण आपला जन्म भारतात, म्हणजे हिंदु भूमीत झाला. येथे ईश्वरी तत्त्व नेहमीच उच्च स्तरावर राहिले आहे आणि ईश्वरालाही हेच अपेक्षित आहे. खरेतर याचा अनुभव काही कलाकार स्वतःही घेत असतात.

५. गणपतीसमोर अश्लील गाण्यांवर केले जाणारे नृत्य हे नर्तक आणि प्रेक्षक यांना अधोगतीकडे नेणारे असणे अन् त्यातून कृत्रिम आणि क्षणिक आनंद मिळणे

जे कलाकार गणपतीसमोर अश्लील गाण्यांवर नृत्य करतात, त्यांना मिळणारा आनंद कृत्रिम असतो. खरेतर तो क्षणिक भ्रम असतो आणि बघणार्‍यांची कामोत्तेजना वाढवणारा असतो. कलाकार आणि प्रेक्षक अनभिज्ञ असतात की, अशा प्रकारची (रज-तम प्रधान) नृत्ये पहातांना ते आध्यात्मिकदृष्ट्या किती खालच्या पातळीवर येत आहेत ! ‘पालक स्वतः आपल्या मुला-मुलींना अगदी लहानपणापासून असे रज-तमप्रधान आणि अधोगतीकडे नेणारे नृत्य करण्यास प्रोत्साहित करतात’, याचा खेद वाटतो.

६. गणपतीसमोर भजन आणि अभंग आदी शांतरसाची अनुभूती देणारे नृत्य प्रकार सादर करणे आवश्यक !

गणेशोत्सवात गणपतीसमोर भजन आणि अभंग आदी नृत्य प्रकार सादर व्हायला हवेत, म्हणजे संपूर्ण वातावरण भक्तीमय होऊन शांतरसाची निर्मिती होईल. शेवटी या शांतरसाची अनुभूतीच मानवाला आकर्षित करत असते, केवळ ती ओळखायला पुष्कळ जन्म घ्यावे लागतात.

‘उत्सव साजरा करतांना दृष्टीकोन आध्यात्मिक असावा आणि त्यातून मिळणारा आनंद हा ईश्वरी आनंद असावा’, हा संदेश नवीन पिढीच्या मनात रुजवणे आवश्यक आहे.’

– सौ. मनीषा पात्रीकर, कथ्थक नृत्यगुरु, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (९.९.२०२४)