सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड

  • २४ सप्टेंबरला संदेश पारकर करणार आंदोलन

  • संबंधितांवर केवळ दंडात्मक कारवाईचा वन विभागाचा प्रयत्न

सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. याविषयी लोकांच्या तक्रारी असतांनाही वनखात्याने वृक्षतोडीचा परस्पर सर्वे केला केला. तो करतांना स्थानिकांना समवेत घ्यायला हवे होते. त्यामुळे पुन्हा सर्वे करून वृक्षतोड करणार्‍यांवर गुन्हा नोंद करावा. केवळ दंड आकारून चालणार नाही, अशी चेतावणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे. या प्रश्नी २४ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता दोडामार्ग तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे पारकर यांनी सांगितले.
सासोली येथील सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पारकर यांनी उपवनसंरक्षक कार्यालयात साहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल संजय कुंभार यांची भेट घेतली. या वेळी अधिकार्‍यांनी वृक्षतोड करणार्‍यांच्या विरोधात केलेल्या कारवाईविषयी माहिती देतांना सांगितले की, या क्षेत्रातील ६ सहस्र झाडे तोडण्यात आली आहेत. त्यासाठी २० लाख रुपये दंड आकारला आहे. तो दंड संबंधितांनी जमा केलेला नाही. (वैयक्तिक कामासाठी लोकांनी झाड तोडल्यास नियमावर बोट ठेवून तातडीने कारवाई करणारा वन विभाग ६ सहस्र झाडे तोडेपर्यंत झोपला होता का ? या घटनेमुळे अवैधरित्या वृक्षतोड करणार्‍यांशी वन विभागातील अधिकार्‍यांचे साटेलोटे तर नाहीत ना ? अशी शंका जनतेला आल्यास चुकीचे ठरेल का ? – संपादक)

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर

यावर पारकर यांनी सांगितले की, दोडामार्ग तालुका पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येतो. त्यामुळे येथे वृक्षतोड करण्यास बंदी असतांना वृक्षतोड करणार्‍यांवर केवळ दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न वन विभाग करत आहे. त्यासह संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला पाहिजे.

आमदार वैभव नाईक यांचा आंदोलनाला पाठिंबा

आमदार वैभव नाईक

याविषयी बोलतांना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले, ‘‘परप्रांतीय व्यक्तींनी ग्रामस्थांच्या सामाईक भूमी सरकारी यंत्रणांना हाताशी धरून बळकावल्या आहेत. या गैरव्यवहाराकडे राज्याच्या महसूल सचिवांचे लक्ष वेधणार आहे. महसूल विभागाने अवैधरित्या केलेल्या नोंदी, अवैधरित्या दिलेल्या अकृषक सनदा रहित करण्याची आणि दोषी अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार आहे. या प्रकरणी संदेश पारकर करणार असलेल्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे.’’

संपादकीय भूमिका

एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहे. यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली जाते. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पर्यावरण संवेदनशील क्षेत्रही निवडली गेली आहेत. असे असतांना वर्षभर होणार्‍या पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करून केवळ हिंदूंचे सण आले की, पर्यावरण रक्षणाचा उमाळा येणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि सर्वसामान्य जनतेला कायद्याचा धाक दाखवून कारवाई करणारे वन विभागाचे अधिकारी बेसुमार होणार्‍या वृक्षतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !