धर्मप्रचार करतांना एका साधकाला धर्मप्रेमींच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि त्यांना आलेल्या अनुभूती

१. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्त धर्मप्रेमींनी प्रसार करणे

१ अ. बीड येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींनी सुरक्षा रक्षकांची सेवा परिपूर्ण करणे : ‘डिसेंबर २०२२ मध्ये बीड येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. त्या सभेच्या सेवेसाठी सोलापूर येथून १८ ते २० धर्मप्रेमी स्वखर्चाने आले होते. त्यांनी पटांगणात सुरक्षारक्षकांची सेवा परिपूर्ण केली.

२. धर्मप्रेमींना श्रीकृष्णाचे चित्र लावल्यावर आलेली अनुभूती

२ अ. सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र घरी लावल्यावर एका धर्मप्रेमींचे एक लाख रुपयांचे अनेक मास खोळंबलेले काम पूर्ण होणे : बीड येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेसाठी आलेल्या एका धर्मप्रेमींनी सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र विकत घेतले. त्यांचे एक लाख रुपयांचे काम अनेक मास रखडले होते. त्यांनी श्रीकृष्णाचे चित्र घरी लावल्यावर त्यांचे ते काम पूर्ण झाले. त्या धर्मप्रेमींनी सांगितले, ‘‘मी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सेवा केल्यामुळेच हे काम झाले.’’

३. धर्मप्रेमी गुरुपौर्णिमेच्या प्रचारकार्यात सहभागी होणे

३ अ. गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन सेवा करणे : वर्ष २०२३ मधील गुरुपौर्णिमेच्या वेळी धर्मशिक्षण वर्गातील ६ – ७ धर्मप्रेमी माझ्या समवेत प्रचाराच्या सेवेमध्येहोते. त्यांनी घरोघरी ‘गुरुपौर्णिमेचे निमंत्रण देणे आणि अर्पण मिळवणे’, अशी सेवा केली. त्यांनी शंभरहून अधिक घरांमध्ये निमंत्रण दिले आणि अर्पण मिळवले. धर्मप्रेमींनी ही सेवा पुढाकार घेऊन केली. काही धर्मप्रेमींनी त्यांचे नातेवाईक आणि मित्र यांच्याकडून अर्पण मिळवले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुष्कळ पाऊस होता, तरीही १५ धर्मप्रेमी गुरुपौर्णिमेला आले आणि त्यांनी रात्री ११.३० वाजेपर्यंत सेवा केली.

४. धर्मप्रेमींना आलेल्या अनुभूती

४ अ. धर्मप्रेमींनी दत्तगुरूंचा नामजप ऐकल्यावर त्यांच्या घरातील कुत्र्यांनी शांतपणे बसून नामजप ऐकणे : मी एका धर्मप्रेमींना भ्रमणभाषमध्ये दत्तगुरूंचा नामजप त्यांच्या घरी लावण्यास सांगितला होता. त्या धर्मप्रेमींनी तो नामजप घरामध्ये लावण्यास आरंभ केला. नंतर ते मला म्हणाले, ‘‘आमच्या घरातील इंग्लडमधून आणलेली २ मोठी कुत्री शांतपणे बसून नामजप ऐकतात; मात्र नामजप बंद केल्यावर ती कुत्री इकडे-तिकडे पळून दंगा करतात.’’

४ आ. धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींची व्यसने सुटणे : धर्मशिक्षणवर्गामध्ये काही धर्मप्रेमी येतात. आम्ही त्यांना धर्माचरण करण्याचे लाभ सांगितले. त्यानंतर बर्‍याच जणांनी आम्हाला सांगितले, ‘‘आम्हाला असलेली व्यसने आम्ही धर्माचरण करू लागल्यावर आणि नामजप करण्यास आरंभ केल्यावर सुटली.’’

४ इ. धर्मप्रेमींना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दाखवणे आणि धर्मप्रेमींना प.पू. गुरुदेवांना भेटण्याची ओढ लागणे : प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त धर्मशिक्षणवर्गामध्ये सर्व धर्मप्रेमींना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दाखवला. त्यानंतर ६ ते ८ मास त्या धर्मप्रेमींच्या तोंडात प.पू. गुरुदेवांचे नाव होते आणि ते धर्मप्रेमी ‘आम्हाला प.पू. गुरुदेवांना भेटायचे आहे’, असे सांगत होते.’

– एक साधक, सोलापूर (२१.७.२०२३)

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची आठवण होऊन भावजागृती होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘एकदा सोलापूर सेवाकेंद्रातील आम्ही काही साधक तुळजापूर येथे एका सेवेनिमित्त गेलो होतो. आम्ही श्री भवानीदेवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. तेव्हा मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची आठवण येत होती. ‘श्री भवानीदेवी, म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’, असे मी अनुभवत होतो. मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सूक्ष्मातून ‘वेगवेगळ्या फुलांचा हार घालणे आणि त्यांच्या चरणांवर फुले अर्पण करणे’, असे भावजागृतीचे प्रयत्न केले. या काही दिवसांच्या कालावधीमध्ये मला प.पू. गुरुदेवांसह (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह) श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची पुष्कळ आठवण येते आणि माझी भावजागृती होते.’

– एक साधक, सोलापूर (२१.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक