अध्यात्मप्रसाराच्या अंतर्गत जिज्ञासूंना भेटण्याची सेवा आध्यात्मिक भावाची जोड देऊन करतांना साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्याने अनुभवलेली गुरुकृपा !

‘जिज्ञासूंना भेटण्याची सेवा परिणामकारक होण्यासाठी साधकात ‘सतर्कता’, ‘शिकण्याची वृत्ती’, ‘मनाची एकाग्रता’, ‘तळमळ’ आणि ‘भाव’, हे गुण असायला हवेत’, असे मला वाटते.’ – श्री. धनंजय हर्षे     

श्री. धनंजय हर्षे

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गोव्यातील पहिल्या सभेला गेल्याने सनातनशी जोडलो गेलो’, असे जिज्ञासूंनी सांगितल्यावर ‘देव कर्तेपणा न्यून करत आहे’, असे जाणवणे

‘पूर्वी माझ्याकडून अध्यात्मप्रसाराच्या अंतर्गत जिज्ञासूंना भेटण्याची सेवा मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर व्हायची. एखाद्या जिज्ञासूला भेटायला गेल्यावर माझ्या मनात विचार यायचा, ‘मी किती वर्षे जवळीक करून त्यांच्याशी चांगला संपर्क ठेवला आहे !’ शेवटी मी त्या जिज्ञासूला त्याचे मत विचारत असे. त्या वेळी जिज्ञासू उत्स्फूर्तपणे म्हणायचे, ‘‘तुम्हाला खरं सांगू ? मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गोव्यातील पहिल्या सभेला गेलो होतो. त्या दिवसापासून मी सनातनशी खर्‍या अर्थाने जोडलो गेलो.’’ तेव्हापासून ‘देवाने माझ्यातील ‘मी जिज्ञासूंना भेटण्याची सेवा चांगली करतो’, हा कर्तेपणा न्यून करण्यास आरंभ केला’, असे मला जाणवले.

२. ‘जिज्ञासूंना आपले बोलणे समजले नाही’, असे लक्षात आल्यावर साधकाने प्रत्येक १० मिनिटांनी स्वतःच्या बोलण्याकडे लक्ष ठेवणे

देवाने ‘जिज्ञासूंना भेटण्याची सेवा करतांना कसे बोलायचे ?’, हे मला शिकवले. जिज्ञासूंसमोर साधनेचा विषय प्रथमच मांडल्यावर ‘मी सांगितलेला विषय जिज्ञासूंना किती समजला ? त्यांच्या क्षमतेप्रमाणे मी आवश्यक ती सूत्रे मांडली का ? त्याचा अपेक्षित असा परिणाम झाला का ?’, हे मला कळत नसे. शेवटी माझ्या लक्षात यायचे, ‘माझे बोलणे जिज्ञासूंना समजले नाही.’ तेव्हापासून बोलतांना प्रत्येक १० मिनिटांनी मी माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवू लागलो.

३. आध्यात्मिक भावाची जोड देऊन सेवा करतांना गुरुकृपेने साधकाच्या लक्षात आलेली सूत्रे !

अ. मी जिज्ञासूंशी बोलत असतांना माझी एकाग्रता असेल, तर ‘समोरची व्यक्ती एकाग्रतेने सूत्र ऐकत आहे का ?’, हे माझ्या लक्षात येते.

आ. देवाला समवेत ठेवून आणि त्याचे स्मरण करून बोलल्यावर अपेक्षित परिणाम होतोच. वेगळे काहीच करावे लागत नाही. ‘जिज्ञासूंना विषयाचे आकलन झाल्यावर त्यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा पालटलेला चेहरा, यावरून योग्य परिणाम होत आहे’, हे माझ्या लक्षात येते.

इ. परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करून जिज्ञासूंचे बोलणे ऐकल्यावर ‘ते बोलणे खरे आहे कि खोटे ?’, हे मला ओळखता येते.

ई. बोलतांना मला समोरच्या व्यक्तीच्या स्पंदनांचा अभ्यासही करता येऊ लागला. यामध्ये ‘जिज्ञासू व्यक्ती मनापासून बोलत आहे का ?’, हे गुरुकृपेने माझ्या लक्षात येते.

उ. एखादा विज्ञापनदाता समोर आल्यावर ‘त्याची आध्यात्मिक पातळी चांगली आहे’, हे माझ्या लक्षात येते.

ऊ. ‘एखाद्या विज्ञापनदात्याची साधना चांगली चालू आहे’, हे त्याला पहाताक्षणी देव माझ्या लक्षात आणून देतो.

ए. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून ‘त्या व्यक्तीमध्ये भाव आणि तळमळ आहे का ?’, हेही देव माझ्या लक्षात आणून देतो.

ऐ. शेवटी जिज्ञासूंचे मत घेतांना ‘मी जे काही बोललो, ते जिज्ञासूला समजले असावे’, हे माझ्या लक्षात येते.

ओ. जिज्ञासूंशी बोलतांना ‘मी योग्य वेळी कुठे थांबायचे ?’, हे देवच मला सुचवतो आणि तशी कृती माझ्याकडून करून घेतो.

औ. ‘मी दिवसभरात ज्या जिज्ञासूंना भेटलो, त्यांच्यापैकी किती जिज्ञासूंना पुन्हा भेटायला हवे ?’, हे माझ्या लक्षात येते.

‘देवा, ‘माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला खरंच शब्द नाहीत. कृतज्ञता !’

– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.२.२०२३)