Trump Assassination : अमेरिकेत माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्‍यावर पुन्‍हा गोळीबार !

फ्‍लोरिडा (अमेरिका) – येथील पाम बीचवर ट्रम्‍प गोल्‍फ क्‍लबच्‍या बाहेर १५ सप्‍टेंबर या दिवशी झालेल्‍या गोळीबारात माजी राष्‍ट्राध्‍यक्ष आणि अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदाचे रिपब्‍लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प थोडक्‍यात बचावले. गोळीबार झाला, त्‍या वेळी ट्रम्‍प क्‍लबमध्‍ये गोल्‍फ खेळत होते. ट्रम्‍प सुरक्षित आहेत; मात्र या घटनेनंतर ट्रम्‍प गोल्‍फ कोर्सच्‍या परिसरात अमेरिकी पोलीस आणि गुप्‍तचर यंत्रणा सुरक्षेचा आढावा घेत आहेत. ‘हे आक्रमण म्‍हणजे ट्रम्‍प यांच्‍या हत्‍येचा पुन्‍हा केलेला प्रयत्न’, असे सांगितले जात आहे. आक्रमणकर्ते ट्रम्‍प यांच्‍यापासून ३००-५०० मीटर अंतरावर होते. काही दिवसांपूर्वी ट्रम्‍प भाषण देत असतांना त्‍यांच्‍यावर गोळीबार करण्‍यात आला होता.

१. भारतीय वेळेनुसार ही घटना रात्री २ च्‍या सुमारास घडली. ‘आम्‍ही या घटनेचे अन्‍वेषण करत आहोत’, अशी माहिती गुप्‍तचर संस्‍थेच्‍या अधिकार्‍यांनी दिली. ‘गोल्‍फमधील झाडांमध्‍ये लपलेल्‍या एका संशयिताला पकडण्‍यात आले आहे’, असे ट्रम्‍प यांचा मुलगा डोनाल्‍ड ट्रम्‍प ज्‍युनिअर यांनी सांगितले आहे.

२. वॉश्‍गिंटन पोस्‍टनेही याचे वृत्त प्रकाशित केले आहे. त्‍यानुसार गोळीबार चालू होताच सीक्रेट सर्व्‍हिसच्‍या सैनिकांकडून डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना क्‍लबच्‍या एका खोलीत नेण्‍यात आले.

३. या गोळीबाराच्‍या घटनेनंतर डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी त्‍यांच्‍या समर्थकांना ईमेल पाठवला आहे. ‘मी कधीही झुकणार नाही. माझ्‍या आजूबाजूला गोळीबार झाला; परंतु अफवांवर विश्‍वास ठेवू नका. मी सुरक्षित आणि ठीक आहे. कुणीही मला रोखू शकत नाही’, असे ट्रम्‍प यांनी त्‍यात म्‍हटले आहे.

अमेरिकेत हिंसेसाठी जागा नाही ! –  कमला हॅरिस

कमला हॅरिस

अमेरिकी राष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या डेमोक्रॅटिक पक्षाच्‍या उमेदवार आणि उपराष्‍ट्रपती कमला हॅरिस म्‍हणाल्‍या की, माजी राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्‍प यांच्‍यावर गोळीबार झाल्‍याचे माझ्‍या ऐकण्‍यात आले. ट्रम्‍प सुरक्षित असल्‍याचे ऐकून मला बरे वाटले. अमेरिकेत हिंसेसाठी कुठलीही जागा नाही.