‘७.९.२०२३ या दिवशी आम्ही (मी, माझे पती श्री. संतोष नान्नीकर आणि मुलगी कु. अक्षरा नान्नीकर (वय ६ वर्षे) यांचा दुचाकी गाडीवरून जात असतांना भीषण अपघात झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही सर्वजण या अपघातातून वाचलो. अपघात झाल्यावर, तसेच रुग्णालयात उपचार घेतांना आम्ही गुरुकृपेचा वर्षाव अनुभवला. उपचारांच्या वेळी पुणे येथील सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक आणि साधक यांचे आम्हाला पुष्कळ साहाय्य मिळाले.
सैन्यदलातील अधिकारी अपघाताच्या वेळचा प्रसंग सांगतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात येऊन अक्षराची काळजी घेतली’, असे जाणवणे
अपघातानंतर आम्हाला रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य करणार्या सैन्यदलातील अधिकार्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना संपर्क केला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘अपघातानंतर अक्षरा दूर फेकली गेली. तेव्हा एका महिलेने तिला उचलून मांडीवर घेतले. त्याच महिलेने तिला रिक्शात बसल्यावर कुशीतही घेतले होते. रुग्णालयातही ती महिला अक्षराच्या समवेत होती.’’ ते हा प्रसंग सांगत असतांना मला ‘श्री महालक्ष्मीच्या रूपात जरीची लाल साडी परिधान केलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ दिसल्या आणि ‘त्यांनीच अक्षराला कुशीत घेतले आहे’, असे दृश्य दिसले. ‘विष्णुस्वरूप गुरुदेवांनीच आमच्या रक्षणासाठी श्री महालक्ष्मीदेवीला पाठवले होते’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
– सौ. रिमा संतोष नान्नीकर, हडपसर
रुग्णालय आणि अन्य प्रक्रिया यांसंदर्भात पू. (सौ.) मनीषा पाठक अन् सहसाधक यांनी पुष्कळ साहाय्य करणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी घडवलेल्या गुरुसेवकांप्रती अपार कृतज्ञता वाटणे
अपघात झाल्यापासून ते आम्ही रुग्णालयातून बाहेर पडेपर्यंत पुणे जिल्ह्यातील अनेक साधक निरपेक्ष भावाने आम्हा कुटुंबियांची सेवा करत होते. पू. (सौ.) मनीषाताईंनी जिल्ह्यातील साधकांना आमचा अपघात झाल्याचे कळवल्यानंतर साधक हातातील सगळी कामे सोडून, तर कुणी कार्यालयीन सुटी घेऊन आमच्या साहाय्याला धावून आले. रुग्णालयातील ८ दिवसांच्या कालावधीत सकाळची न्याहरी, दुपारचा आणि रात्रीचा महाप्रसाद यांसाठीचे सर्व नियोजन स्वतः पू. (सौ.) मनीषाताईंनी केले आणि सर्व साधकांनी अतिशय प्रेमाने, साधना म्हणून ही सेवा केली. डब्यात येणार्या महाप्रसादाकडे पाहूनच आमची भावजागृती होत होती. काही साधक रुग्णालयातील कार्यालयीन प्रक्रिया, तसेच पोलीस ठाण्यातील प्रक्रिया करण्यासाठी धावपळ करत होते. रात्री मला काही आवश्यक वाटले, तर साधक तत्परतेने साहाय्य करायचे. तेव्हा गुरुदेवांनी घडवलेल्या या गुरुसेवकांप्रती माझ्या मनात अपार कृतज्ञताभाव जागृत व्हायचा.
सद्गुरु आणि संत यांची निरपेक्ष प्रीती अनुभवणे
पू. (सौ.) मनीषाताई या सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या सतत संपर्कात होत्या. माझ्या शस्त्रकर्माच्या दिवशी दिवसभर शस्त्रकर्मगृहाच्या (‘ऑपरेशन थिएटर’च्या) बाहेर बसून त्या नामजप आणि प्रार्थना करत होत्या. त्याच वेळी भ्रमणभाषवरून त्यांची सेवाही चालू होती.
– सौ. रिमा संतोष नान्नीकर, हडपसर
१. सौ. रिमा संतोष नान्नीकर, हडपसर, पुणे.
१ अ. दुचाकी गाडीवरून जातांना ‘टेम्पो’ची धडक बसून मोठा अपघात होणे : ७.९.२०२३ या दिवशी आम्ही (मी, कु. अक्षरा आणि यजमान) बाहेर गेलो होतो. घरी परततांना वानवडी येथे चढावावरून येणार्या एका तीनचाकी ‘टेम्पो’चे नियंत्रण सुटून तो आमच्या दुचाकी गाडीवर धडकला. ‘टेम्पो’ धडकल्यानंतर यजमानांच्या उजव्या खांद्याला लागले आणि त्यांच्या खांद्याचा अस्थिभंग झाला. अक्षरा दूर फेकली जाऊन तिच्या डोक्याला मार लागला आणि नंतर तिला ५ टाके पडले. मी ‘टेम्पो’च्या खाली आले आणि ‘टेम्पो’चा मोठा भाग माझ्या अंगावर पडला. त्यामुळे माझ्या चेहर्यावर मोठ्या प्रमाणात मार लागला. त्या वेळी तेथे असलेल्या सैन्यदलातील एका अधिकार्याने मला आणि अक्षराला रिक्शात बसवून रुग्णालयात नेले.
१ आ. अक्षराच्या डोक्याला मार लागल्याने पुष्कळ रक्तस्राव होणे आणि पू. (सौ.) मनीषा पाठक तिच्याजवळ थांबल्यानंतर त्यांच्या चैतन्यामुळे तिचा रक्तस्राव थांबणे : रुग्णालयात गेल्यानंतर यजमानांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांना अपघाताविषयी कळवले. पू. (सौ.) मनीषाताईंनी लगेचच सद्गुरु गाडगीळकाकांना नामजपादी उपाय विचारले, तसेच साधकांनाही साहाय्यासाठी बोलावले. अक्षराच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वहात होते. ते रक्त पाहून तेथील परिचारिकेला चक्कर आली. तेव्हा पू. (सौ.) मनीषाताई अक्षराजवळ थांबल्या आणि त्यांच्या चैतन्यामुळे अक्षराचे रक्त वहायचे थांबले. त्यामुळे तिला टाके घालणे सुलभ झाले. पू. (सौ.) मनीषाताईंच्या चैतन्यामुळे एवढ्या लहान वयात तिला यातना सहन करण्याची शक्ती मिळाली. त्यानंतर आम्हाला पुढील उपचारांसाठी पुण्यातील अन्य रुग्णालयात नेण्यात आले.
१ इ. यजमानांच्या खांद्याचा अस्थिभंग होऊन, तसेच साधिकेला पुष्कळ मार लागूनही दोघांना वेदना न होणे, ही केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचीच कृपा असणे : यजमानांच्या उजव्या खांद्याचा अस्थिभंग होऊनही त्यांना कोणत्याच वेदना होत नव्हत्या. अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे मी २ दिवस बेशुद्धच होते. माझ्या चेहर्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती, तरीही मला कसलीच वेदना जाणवत नव्हती. ‘मी रुग्णालयात आहे आणि मला काहीतरी झाले आहे’, एवढेच माझ्या लक्षात येत होते. माझ्या शरिराच्या पूर्ण उजव्या बाजूला मुका मार लागला होता. असे असूनही माझा उजवा डोळा, उजवा कान, नाक, तोंड आणि जीभ हे अवयव दुखापत होण्यापासून वाचले होते. माझे हात-पाय आणि बरगड्या यांचाही अस्थिभंग झाला नाही. ही सर्व सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचीच कृपा होती.
१ ई. आई-वडिलांना अनेक शारीरिक त्रास असूनही त्यांनी देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवून सर्व स्वीकारणे आणि लेक-जावयाची काळजी घेणे : माझे वडील श्री. अशोक लिपारे (वय ७३ वर्षे) यांना रक्तदाब आणि मधुमेह यांचा त्रास आहे. अनेक दिवसांपासून त्यांना चक्कर येत होती. आमच्या अपघाताचे समजल्यापासून त्यांनीही आमची अखंड काळजी घेतली. आई सौ. लता लिपारे (वय ६८ वर्षे) हिला २३ वर्षांपासून तीव्र सांधेदुखीचा त्रास आहे, तरीसुद्धा सतत ८ दिवस ती माझ्यासमवेत रुग्णालयात होती. ती प्रत्येक कृती प्रार्थना करून आणि भाव ठेवून करत होती. भावाच्या स्तरावरच तिने सर्व शुश्रूषा केली. तिच्या भावपूर्ण प्रार्थना ऐकून माझाही भाव जागृत होत असे. या संपूर्ण कालावधीत आई-वडिलांना त्यांचे वय आणि त्रास यांचा संपूर्णतः विसर पडला होता. देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी सर्व काही सकारात्मक राहून स्वीकारले.
१ उ. रुग्णालयात आणि घरी असतांना केलेले भावप्रयोग
१. मी शस्त्रकर्मगृहात जात असतांना ‘शस्त्रकर्मगृह म्हणजे गुरुदेवांची खोली आहे’, असा भाव ठेवला.
२. ‘आधुनिक वैद्य म्हणजे प.पू. गुरुदेव शुभ्र वस्त्र धारण करून माझे शस्त्रकर्म करण्यासाठी आले आहेत’, असे मला जाणवले.
३. ‘खोलीमध्ये आधुनिक वैद्य, ‘फिजिओथेरपिस्ट’ (भौतिकोपचारतज्ञ) किंवा परिचारिका असे कुणीही आले, तरी ‘प्रत्यक्ष गुरुदेवच मला पहाण्यासाठी येत आहेत’, असे मला जाणवायचे.
४. ‘सलाईन’ लावलेले असतांना ‘गुरुदेवांचे दिव्य चरणामृत माझ्या संपूर्ण शरिरात जात आहे आणि त्यातून मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवत असे.
५. डोळ्यांमध्ये औषध घालतांना ‘गुरुदेवांचे दिव्य चरणतीर्थ मी डोळ्यांमध्ये घालत आहे’, असा भाव ठेवल्याने सुजून लालबुंद झालेला माझा डोळा अल्पावधीतच सुस्थितीत आला.
६. रुग्णालयातून घरी आल्यावर घरामध्ये चालतांना ‘गुरुदेवांनी माझे बोट धरले असून मी रामनाथी आश्रमातील भूमीवरून चालत आहे’, असा माझा भाव असायचा.
१ ऊ. कृतज्ञता : केवळ आणि केवळ गुरुकृपेनेच आम्हाला या कठीण अन् जिवावर बेतलेल्या प्रसंगावर मात करता आली. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आम्हाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. मला पुनर्जन्म देणार्या आणि प्रत्येक श्वासाला माझी काळजी घेणार्या गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझे शब्दच अपुरे आहेत. असे ब्रह्मांडनायक, संपूर्ण विश्वाचे पालन करणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांसारखे गुरु लाभले, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
२. श्री. संतोष नान्नीकर, हडपसर, पुणे.
२ अ. पू. (सौ.) मनीषाताई आणि श्री. महेश पाठक यांच्या आश्वासक शब्दांमुळे पुष्कळ आधार मिळणे : ‘आमचा मोठा अपघात होऊनही माझा आणि पत्नीचा भ्रमणभाष सुस्थितीत राहिला. त्यामुळे अपघात झाल्यावर मला पू. (सौ.) मनीषाताई, आणि नातेवाईक यांना तत्परतेने संपर्क करता आला. पू. (सौ.) मनीषाताई सकाळी लवकर रुग्णालयात आल्या आणि दिवसभर तेथेच थांबल्या. त्या आणि त्यांचे यजमान श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४३ वर्षे) यांच्या ‘प.पू. गुरुदेव आपल्या समवेत आहेत अन् सर्व काही ठीक होणार आहे’, या भावपूर्ण अन् आश्वासक शब्दांमुळे मला पुष्कळ आधार मिळाला.
२ आ. अपघात झाल्यानंतर रुग्णालयातील उपचार घेणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे, ही प्रक्रिया पूर्ण करतांना माझ्या ‘उजव्या हातामध्ये गुरुदेवच बळ देत आहेत’, असे मला जाणवले.
२ इ. गुरुदेवांच्या कृपेने सकारात्मकता अनुभवणे : या अपघातात पत्नी आणि लहान मुलगी यांना गंभीर दुखापत होऊनही केवळ गुरुदेवांच्या कृपेने मी सकारात्मक अन् स्थिर होतो.
प.पू. गुरुदेवांची कृपा, सद्गुरु स्वातीताई आणि पू. मनीषाताई यांनी दिलेला आधार, तसेच जिल्ह्यातील सर्व साधकांचे प्रेम, यांमुळेच आम्ही या प्रसंगाला सामोरे जाऊ शकलो, त्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
(सर्व सूत्रांसाठी दिनांक ७.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |