शस्त्रकर्मे होत असतांना आणि त्यानंतरच्या कालावधीत साधिकेला झालेले त्रास अन् तिने अनुभवलेली गुरुकृपा !

६.९.२०२४ या दिवशीच्या लेखात आपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांना ‘आधुनिक वैद्यांनी करायला सांगितलेली शस्त्रकर्मे, त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकणे आणि तेथे स्टेंट बसवणे’, यांविषयी जाणून घेतले. या लेखात ‘साधिकेची झालेली अन्य शस्त्रकर्मे, त्यांना झालेले त्रास आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा’ यांविषयी जाणून घेऊया.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/833675.html

४. पित्ताशय काढून टाकण्याचे शस्त्रकर्म

डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले

४ अ. आधुनिक वैद्यांना आढळलेली साधिकेच्या पित्ताशयाची झालेली गंभीर स्थिती आणि आधुनिक वैद्यांनी केलेली उपाययोजना : ‘ईआर्सीपी’ केल्यानंतर १० दिवसांनी, म्हणजे २२.४.२०२४ या दिवशी डॉ. अविनाश आनंद या शल्यचिकित्सकांनी (सर्जन) माझे पित्ताशय काढून टाकण्यासाठी ‘लॅप्रोस्कोपीद्वारे’ दुर्बिणीतून पाहिले असता त्यांना माझे पित्ताशय दिसत नव्हते; म्हणून त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन माझ्या पोटावर ९ इंचाचा मोठा छेद देऊन शस्त्रकर्म केले. त्या वेळी त्यांना आढळले, ‘माझ्या पित्ताशयात जंतूसंसर्ग होऊन ते फुगले आहे. त्यात पू झाला आहे. माझे पित्ताशय फुटून काही पू पोटाच्या पोकळीत लहान आतड्याच्या जवळ साचला होता. माझे सुजलेले पित्ताशय फुटून जठर आणि लहान आतडे यांना चिकटले होते.’ शल्यचिकित्सकांनी माझे पित्ताशय या अवयवांपासून हळुवारपणे सोडवून मोकळे केले आणि व्यवस्थित कापून बाहेर काढले. नंतर त्यांनी माझ्या पोटात जंतूसंसर्ग होऊ नये; म्हणून पोटाची ती पोकळी ‘सलाईन’द्वारे स्वच्छ धुतली. तेथे प्रतिजैवके (अँटिबायोटिक्स) टाकून पोटावर टाके घालून माझे पोट बंद केले. माझ्या पोटावर २२ टाके घातले गेले. ‘माझ्या पोटाच्या पोकळीत नंतर काही रक्तस्राव झाला, तर तो लगेच पोटातून बाहेर पडून त्याचा निचरा व्हावा’, यासाठी एक ‘ड्रेन’ ठेवला होता. ते रक्त एका ‘प्लॅस्टिक’च्या पिशवीत साठवले जात होते.

४ आ. पित्ताशयाची भयंकर स्थिती पाहून साधिकेला त्यासंबंधी काही लक्षणे दिसत नसल्याविषयी तिचे शस्त्रकर्म करणार्‍या आधुनिक वैद्यांना आश्चर्य वाटणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधिकेचे प्राण वाचणे : माझी अशी स्थिती पाहून डॉ. अविनाश यांना फार आश्चर्य वाटले की, ‘एवढी गुंतागुंत होऊनही मला त्यासंबंधी काहीच लक्षणे कशी दिसून आली नाहीत ?’ मला एवढा जंतूसंसर्ग झाला असतांना ‘ताप येणे, तीव्र्रतेने पोटात दुखणे, बेशुद्ध होणे’, अशी काही लक्षणे दिसायलाच हवी होती; परंतु मला यांपैकी काहीच झाले नव्हते. त्या वेळी माझे यजमान आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांना जाणीव झाली की, ‘ही सर्व गुरुकृपा आहे. केवळ परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधिकेचे रक्षण करून तिचे प्राण वाचवले आहेत.’ माझ्या यजमानांनी तात्काळ गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली. मला भूल दिलेली असल्यामुळे मी त्या वेळी बेशुद्धावस्थेत होते.

४ इ. तिसर्‍या दिवशी शल्यचिकित्सकांनी मला लावलेला ‘ड्रेन’ काढला. त्यात फारसे रक्त साठले नव्हते. नंतर मला चौथ्या दिवशी रुग्णालयातून घरी पाठवले.

४ ई. पोटावर छेद दिल्यामुळे झालेल्या जखमेमुळे सहजतेने बसणे कठीण होणे : माझे पित्ताशय काढून टाकल्यानंतर माझ्या पोटावर शस्त्रक्रियाकर्माची जी मोठी जखम झाली होती, तेथे मला लोखंडी पट्टा बांधल्यासारखे जाणवत होते. मला सहजतेने बसणे कठीण झाले होते. मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर मला तात्पुरते बरे वाटत होते. मी खोलीत पलंगावर झोपून नामजपादी उपाय करत होते. मी पुष्कळ वेळ आसंदीत बसल्यास पोटावरील जखमेचा भाग दुखत असे. माझी मुलगी सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्ती साधिका सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे) हिने सांगितले, ‘‘या शस्त्रकर्मामुळे तुझ्या पोटातील अनिष्ट शक्तीचे स्थान जरी नष्ट झाले असले, तरीही तेथील नकारात्मक शक्ती या शस्त्रकर्माच्या जखमेभोवती गोळा झाली आहे. त्यामुळे जखमेच्या ठिकाणी तुला दुखत आहे.’’

४ उ. आधुनिक वैद्यांनी साधिकेला २ मास पोटाला घट्ट पट्टा बांधून ठेवायला सांगणे : १५ दिवसांनंतर माझ्या पोटावरील टाके काढण्यात आले. माझ्या पोटावर मोठी जखम झाल्यामुळे माझे पोट कमकुवत झाले होते. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी मला २ मास पोटाला घट्ट पट्टा बांधून ठेवायला सांगितले होते. ते म्हणाले, ‘‘असे केले नाही, तर अंतर्गळ (‘हर्निया’) (टीप ५) होण्याची शक्यता वाढते.’’

(टीप ५ – अंतर्गळ (‘हर्निया’) : पोटातील आतड्यासारखा अवयवाचा काही भाग त्वचा आणि स्नायू यांच्या मधल्या भागात पोटाच्या स्नायूंच्या भिंतीतून बाहेर येणे)

५.  २४.७.२०२४ या दिवशी माझ्या पोटातील ‘स्टेंट’ काढण्याचे शस्त्रकर्म झाले.

६. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शोधून दिलेल्या नामजपादी उपायांचा झालेला अत्याधिक लाभ ! : ‘माझी शस्त्रकर्मे निर्विघ्नपणे पार पडावीत, तसेच जखम चांगली भरून यावी आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढावे’, यांसाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला नामजपादी उपाय शोधून दिले. माझ्या पोटात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतागुंत होऊनही नामजपादी उपायांमुळे मी आज सुखरूप आहे.

७. श्री गुरूंच्या कृपेमुळे साधिकेला मोठ्या शस्त्रकर्माला सामोरे जाण्याची भीती न वाटणे

गुरुदेवांनीच मला ३ शस्त्रकर्मांना सामोरे जायचे बळ दिले. माझ्या सर्व तपासण्या चालू असतांना मी शांतपणे सेवा करत होते. ‘माझे शस्त्रकर्म होणार आहे’, हे माझ्या सहसाधिकांना ठाऊक होते. त्या वेळी मला काही साधिकांनी विचारले, ‘‘तुम्हाला शस्त्रकर्माची भीती वाटत नाही का ?’’ तेव्हा मी सांगितले, ‘‘माझे वय ६९ वर्षे आहे. यातून जगले वाचले, तर गुरुकृपा आहे आणि जर मला मरण आले, तर माझ्या जीवनाचे सोने होईल. गुरूंच्या आश्रमात शेवटचा श्वास घेणे, यासारखे दुसरे सौभाग्य कोणते असू शकते !’’

८. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ती साधिका सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी ‘तिच्या आईच्या पोटावर ‘लॅप्रोस्कोपी’ने शस्त्रकर्म न होता मोठे शस्त्रकर्म होण्यामागे सूक्ष्मातून अनिष्ट शक्ती कारणीभूत आहेत आणि श्री गुरुकृपेने आईचे रक्षण झाले’, असे सांगणे

मी मधुराला विचारले, ‘‘मला असा त्रास होण्याचे कारण काय आहे ?’’ त्या वेळी तिने सांगितले, ‘‘वर्ष २००३ मध्ये देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात त्या वेळच्या सूक्ष्म विभागातील साधकांनी (पू. विनय भावेकाका आणि इतर संत यांनी) माझ्यासाठी सलग २ दिवस नामजपादी उपाय केले होते. मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीने माझ्या पोटात एक विषाची कुपी ठेवली होती. साधकांनी नामजपादी उपाय करून ती कुपी माझ्या पोटातून काढून टाकली; परंतु त्या शक्तीचे स्थान माझ्या पित्ताशयात होते.’’

मधुराने नंतर मला सांगितले, ‘‘तुझ्या पित्ताशयाला जंतूसंसर्ग झाला, तरीही काहीच लक्षणे दिसून आली नाहीत; कारण अनिष्ट शक्तीने तुझ्यावर काळे आवरण आणून सर्व लक्षणे रोखून ठेवली होती. त्यामुळे अनिष्ट शक्तीला तुला मारणे शक्य झाले असते; मात्र परम कृपाळू गुरुमाऊलीने योग्य वेळी हस्तक्षेप करून तुझे शस्त्रकर्म करून घेऊन त्या अनिष्ट शक्तीचे स्थानच नष्ट केले. त्यामुळे अनिष्ट शक्तीचा तुला मारण्याचा डाव उधळला गेला.’’ मला ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीची प्रचीती घेतली. यासाठी मी परात्पर गुरु डॉ. यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती अल्पच आहे.

९. साधिकेच्या कुटुंबियांनी साधिकेची पुष्कळ काळजी घेणे, साधिकेला आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्यामधील प्रेमभाव जाणवणे अन् ‘साक्षात् गुरुमाऊली साधकांच्या माध्यमातून साहाय्य करत आहे’, असे जाणवणे

मला कुटुंबातील सर्व सदस्यांनी पुष्कळ प्रेमाने साहाय्य केले. माझे दोघे बंधू मला वरचेवर संपर्क करून माझ्या प्रकृतीची विचारपूस करत होते. ते गोव्याला येऊन मला भेटून गेले. माझ्यावर उपचार करणारे आधुनिक वैद्य, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांच्याकडून मला पुष्कळ प्रेमभाव अनुभवता आला. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधक मला वेळोवेळी साहाय्य करत असतांना ‘साक्षात् गुरुमाऊलीच साधकांच्या रूपाने मला साहाय्य करत आहे’, असे जाणवून माझा भाव जागृत होत असे.

१०. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हा सर्वसामान्य साधकासाठी किती करतात’, याची जाणीव होणे

माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर माझ्याकडे पाहून कुणालाही ‘मी एवढ्या गंभीर परिस्थितीतून वाचले आहे’, असे वाटत नव्हते. माझ्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. ‘साधकाच्या जीवनात जे घडते, ते त्याच्या कल्याणासाठीच गुरु आणि देव घडवत असतात’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. मला आता ज्या सुविधा उपलब्ध झाल्या, त्या आपत्काळात मिळू शकणार नाहीत. आपत्काळात मला पुष्कळ त्रासाला सामोरे जावे लागले असते. ‘गुरु साधकाच्या जीवनातील प्रारब्ध मागे-पुढे करून त्याच्याकडून प्रारब्ध सुसह्यपणे भोगून घेतात’, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. ‘परात्पर गुरु आम्हा सर्वसामान्य साधकासाठी किती करतात’, याची मला जाणीव होऊन माझे डोळे कृतज्ञतेने भरून आले. मी अनंत कोटी वेळा गुरुचरणी कृतज्ञ आहे.

११. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला सांगितले, ‘‘तुमची आंतरिक साधना चालू असल्यामुळे तुम्ही पूर्वीपेक्षा पुष्कळ आनंदी दिसत आहात.’’

१२. कृतज्ञता आणि प्रार्थना

पल-पल, पग-पग जीवन पथ पर ।
गुरु साथ मेरे रक्षक बनकर ।
गुरुदेव, तव महनीय कृपा ।।

‘हे गुरुदेवा, आपणच मला अखंड आपल्या अनुसंधानात ठेवून माझ्याकडून आपल्याला अपेक्षित अशी साधना करून घ्या’, अशी आपल्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’

(समाप्त)

– गुरुचरणी शरणागत,

आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक