India ‘Semiconductor Powerhouse’ : जगातील प्रत्‍येक उपकरणात भारतीय ‘चिप’ असावी ! – मोदी

  • पंतप्रधानांच्‍या हस्‍ते ‘सेमिकॉन इंडिया’चे उद़्‍घाटन

  • भारताला ‘सेमीकंडक्‍टर पॉवरहाऊस’ बनवण्‍याचा मानस

(‘सेमीकंडक्‍टर’ म्‍हणजे अर्धसंवाहक. ‘सेमीकंडक्‍टर’ हा इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्र आणि उपकरणे यांमधील महत्त्वाची सामुग्री, तर चीप म्‍हणजे छोटी चकती.)

‘सेमीकॉन इंडिया २०२४’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवर

नवी देहली – भारतला ‘सेमीकंडक्‍टर पॉवरहाऊस’ बनवण्‍यासाठी शक्‍य ती सर्व पावले सरकार उचलेल. सरकार देशात चिप उत्‍पादन वाढीवर भर देत आहे. आमचे स्‍वप्‍न आहे की, जगातील प्रत्‍येक उपकरणात भारतीय चिप असावी, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ग्रेटर नोएडा येथे ‘सेमीकॉन इंडिया २०२४’ या सेमीकंडक्‍टर उद्योगाशी संबंधित कार्यक्रमाचे उद़्‍घाटन पंतप्रधानांच्‍या हस्‍ते झाले. त्‍या वेळी ते बोलत होते.

पंतप्रधान पुढे म्‍हणाले, ‘‘स्‍मार्टफोनल इलेक्‍ट्रॉनिक वाहन, आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स आदी सर्व गोष्‍टींचा सेमीकंडक्‍टर हाच आधार आहे. भारत सेमीकंडक्‍टर उद्योगाशी संबंधित कार्यक्रम आयोजित करणारा जगातील आठवा आहे.’’

या क्षेत्रात ६० लाख नोकर्‍या निर्माण होतील

पंतप्रधान पुढे म्‍हणाले, ‘‘आज भारताचा मंत्र ‘चिप उत्‍पादन वाढवणे’, हा आहे. सेमीकंडक्‍टर उत्‍पादन वाढवण्‍यासाठी भारत सरकार ५० टक्‍के अर्थसाहाय्‍य करत आहे. या क्षेत्रात फार अल्‍प वेळेत १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. अनेक प्रकल्‍प कार्यान्‍वित होण्‍याच्‍या मार्गावर आहेत. टाटा समूह तैवानच्‍या कंपनीसह आणि अदानी समूह महाराष्‍ट्रात इस्रायली कंपनीसह ‘चिप प्‍लांट’ उभारत आहे. ‘अमेरिकन मेमरी मेकर मायक्रोन टेक्नॉलॉजी’ गुजरातमध्‍ये कारखाना उभारत आहे. ‘सीजी पॉवर’ गुजरातमध्‍ये ‘चिप पॅकेजिंग प्‍लांट’ उभारत आहे. सेमीकंडक्‍टरच्‍या ‘डिझाईनिंग’मध्‍ये देशाचे योगदान २० टक्‍के आहे. सेमीकंडक्‍टरच्‍या निर्मितीसाठी भारत ८५ सहस्र तंत्रज्ञ, अभियंते आणि तज्ञ सिद्ध करत आहे.

भारताचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्र १५० अब्‍ज डॉलरचे आहे. दशकाच्‍या शेवटी ते ५०० अब्‍ज डॉलरपर्यंत पोचण्‍याचे उद्दिष्‍ट आहे. त्‍यातून ६० लाख रोजगार निर्माण होऊ शकणार आहेत.’’