Ukraine-Russia War : रशियाच्या बाजूने युक्रेन युद्धात लढणार्‍या १२ भारतियांचा मृत्यू

१६ जण अद्याप बेपत्ता

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल

नवी देहली – आतापर्यंत १२६ भारतीय नागरिक रशियाच्या सैन्यात सहभागी झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी ९६ जण भारतात परतले आहेत. युक्रेनमध्ये आतापर्यंत रशियाच्या बाजूने लढणार्‍या १२ भारतियांचा मृत्यू झाला आहे. रशियामध्ये अजूनही १८ भारतीय नागरिक अडकले असून त्यापैकी १६ जणांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी आम्ही काम करत आहोत, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रशियाच्या सैन्यावर अनेक भाडोत्री सैनिक आणि इतर देशांतील लोकांना बलपूर्वक युक्रेन युद्धात पाठवल्याचा आरोप आहे. यामध्ये अनेक भारतियांचाही समावेश आहे. अनेक जण नोकरीच्या शोधात रशियाला गेले आणि तिथेच अडकले.

संपादकीय भूमिका

रशियाने त्याच्या सैन्यात बलपूर्वक भरती करून घेतलेल्या भारतियांना मायदेशी पाठवण्याचे आश्वासन दिले असतांना त्याने ते का पार पाडले नाही, याचा जाब कोण विचारणार ?