Maha Kumbh Hindu Rashtra : भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याविषयी आखाडे सक्रीय ! – पू. संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी, अध्यक्ष, महात्यागी सेवा संस्थान, तिरखेडी आश्रम, गोंदिया, महाराष्ट्र

प्रयागराज महाकुंभपर्व २०२५

प्रयागराज, १८ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जून २०२४ मध्ये पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त मी एक गोष्ट सांगितली होती की, महाकुंभपर्वात सर्व आखाड्यांत एक एक फलक लावून त्यावर ‘आम्ही हिंदु राष्ट्राच्या बाजूने आहोत’, असे लिहिण्यात यावे. भारत सरकारने भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र घोषित करावे. त्यानुसार आज संपूर्ण महाकुंभपर्वात तशा हालचाली चालू झाल्या आहेत. सर्व आखाडे सक्रीय झाले आहेत. महाकुंभात आलेल्या सर्व संतांनी भारत हिंदु राष्ट्र झालेच पाहिजे, असा मनात ठाम निश्चय केला आहे. त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात येईल. महाकुंभपर्वात प्रत्येक ठिकाणी हिंदु राष्ट्राचे फलक लावण्यात आले आहेत, असे मार्गदर्शन महाराष्ट्रातील गोंदिया येथील महात्यागी सेवा संस्थानचे अध्यक्ष पू. संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी यांनी १८ जानेवारी या दिवशी येथे केले.

पू. संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी यांनी महाकुंभ येथे लावण्यात आलेले सेक्टर १९ मधील मोरी मार्गावरील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी पू. संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

पू. संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी पुढे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचा उद्देश आहे की, भारत हिंदु राष्ट्र झाला पाहिजे. या कारणास्तव गेल्या १५ वर्षांपासून मी सनातन संस्थेशी जोडलो आहे. विश्व हिंदु परिषदेच्या वतीने कुंभक्षेत्री २५, २६ आणि २७ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मसंसदे’त संत संमेलन, युवा संमेलन, महिला संमेलनामध्ये भारताला हिंदु राष्ट्र घोषित बनवण्याविषयी जागृती करण्यात येईल. यासाठी भारत हिंदु राष्ट्र असायला हवे. हिंदु राष्ट्राचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्या ज्या वेळी हिंदू जागे झाले, त्या त्या वेळी देशाचे संकट टळले आहे. मला वाटते की, ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे श्री रामलल्ला आले आहेत, श्रीरामाचा राज्याभिषेक झाला आहे, तर भारतात रामराज्य येईलच; मात्र भारत हिंदु राष्ट्र झाल्यानंतर भारतात रामराज्य येईल.’’