गौरीपूजनाच्या दिवशी महालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन होऊन त्यांचे कृपाशीर्वाद मिळणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘२२.९.२०२३ या दिवशी, म्हणजे गौरी पूजनाच्या दिवशी सकाळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रापुढे उदबत्ती ओवाळत होते. त्यानंतर मी घरी स्थापन केलेल्या गौरींचे स्मरण केले. (भाद्रपद शुक्ल सप्तमीला काही जणांकडे घरात मुखवटे ठेवून गौरींची स्थपना करतात. त्यांना साडी नेसवून फुलांनी सुशोभित करतात.)

कु. रजनीगंधा कुर्‍हे

तेव्हा मला पुढील दृश्य दिसले – ‘त्या दोन्ही गौरींच्या ठिकाणी मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दिसल्या. त्या दोघी पाटावर बसल्या होत्या आणि मी त्यांची ओटी भरत होते. ओटीमध्ये मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना लाल रंगाची साडी आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना हिरव्या रंगाची साडी देत आहे. त्यांची ओटी भरत असतांना मला आतून पुष्कळ आनंद जाणवत होता. ओटी भरल्यावर मी त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. त्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला क्रियाशक्तीचा आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ज्ञानशक्तीचा आशीर्वाद दिला. त्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला म्हणाल्या, ‘‘तुझ्याकडे इच्छाशक्ती आहे. आता आम्ही तुला क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती प्रदान करतो.’’ गौरी पूजनाच्या दिवशी महालक्ष्मीस्वरूप असलेल्या सद्गुरुद्वयींचे कृपाशीर्वाद मिळाल्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.९.२०२३)

हिदु धर्मसंस्कृतीने कु. रजनीगंधा कुर्‍हे यांच्याकडून सूक्ष्मातील दृश्यातही धर्मपालन करवून घेणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

प्रश्न : ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची ओटी भरत असतांना मला मी स्वतः सुवासिनीच्या वेशात दिसले. याचे कारण काय असू शकेल ?’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे

उत्तर : ‘एखाद्या सौभाग्यवतीची ओटी भरणे; म्हणजे तिच्यातील सृजनशीलतेचा (नवनिर्मितीचा) सन्मान करणे. हा सन्मान सृजनशीलतेला पात्र असणारी सुवासिनी, म्हणजे सौभाग्यवती स्त्रीच करू शकते. कुमारिका किंवा विधवा स्त्रीला तो अधिकार हिंदु धर्मशास्त्राने दिलेला नाही.

कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना दिसलेल्या सूक्ष्मातील दृश्यात त्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची ओटी भरत असल्याचे दिसले अन् त्या दृश्यात त्या स्वतः सुवासिनीच्या वेशात होत्या. यावरून हिंदु धर्मसंस्कृतीने कु. रजनीगंधा कुर्‍हे यांच्याकडून सूक्ष्मातील दृश्यातही धर्मपालन करवून घेतले, हे लक्षात येते. हेच हिंदु धर्मसंस्कृतीचे श्रेष्ठत्व आहे.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.१०.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक