President Rule For Delhi : केजरीवाल सरकार विसर्जित करून देहलीत राष्‍ट्रपती राजवट लागू करा ! – भाजप

नवी देहली – केजरीवाल सरकार विसर्जित करून देहलीत राष्‍ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजपने राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली. मद्य घोटाळ्‍याच्‍या प्रकरणी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल हे जवळपास ६ महिन्‍यांपासून कारागृहात असल्‍याने देहलीत ‘संविधानिक संकट’ निर्माण झाल्‍याचे भाजपचे म्‍हणणे आहे.

देहली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्‍ता यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपच्‍या आमदारांनी ३० ऑगस्‍ट या दिवशी राष्‍ट्रपतींची भेट घेऊन त्‍यांना निवेदन सादर केले. तथापि ३० ऑगस्‍टची ही माहिती आता उघड झाली आहे. राष्‍ट्रपती सचिवालयाने भाजपचे हे निवेदन केंद्रीय गृह सचिवांकडे पाठवले आहे. देहलीत सध्‍या चालू असलेल्‍या ‘संविधानिक संकटा’कडे योग्‍य लक्ष देण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे राष्‍ट्रपती सचिवालयाचे म्‍हणणे आहे. यासह भाजपने या निवेदनात देहली सरकारची व्‍यवस्‍था, आर्थिक अनियमितता आणि लोकांची स्‍थिती, यांविषयी तक्रार केली आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असल्‍याचे यात म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका 

एका अतीमहत्त्वाच्‍या राज्‍याचा मुख्‍यमंत्री जवळपास ६ महिन्‍यांपासून कारागृहात असणे आणि तरी तो अद्यापही मुख्‍यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची घोर विटंबना आहे. राज्‍यातील जनतेचे प्रश्‍न सोडवण्‍यासाठी मुख्‍यमंत्रीच उपलब्‍ध नसणे, यापेक्षा लोकशाहीचा मोठा पराभव कुठला असेल ?