फोंडा – केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा मंदिरात श्री देवीसमोर गार्हाणे घालून (प्रार्थना करून) आणि विशेष सिद्ध केलेली ‘सावधान ! श्री विजयादुर्गा मंदिराचे मूळ स्थान चर्चच्या घशात जातेय !’, ही पुस्तिका देवीच्या चरणी समर्पित करून १ सप्टेंबरला हिंदू रक्षा महाआघाडीने ‘शंखवाळ येथील श्री विजयादुर्गा वारसास्थळ-मुक्ती जागरण मोहिमे’चा शुभारंभ केला. या वेळी उपस्थित राहिलेले येथील श्री विजयादुर्गा मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र देसाई यांच्याकडेही काही जागरण पुस्तिका सुपुर्द करण्यात आल्या.
याप्रसंगी हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, सहनिमंत्रक श्री. नितीन फळदेसाई, राज्य सहसंघचालक प्रा. प्रवीण नेसवणकर, कार्यवाह श्री. संदीप पाळणी, सहकार्यवाह श्री. गणेश गावडे, कोषाध्यक्ष श्री. सूर्यकांत गावस, मध्यगोवा प्रमुख श्री. श्रीराम पालकर आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक उपस्थित होते. पुरातत्व खात्याने १९८३ मध्ये शंखवाळ (सांकवाळ) येथील उद्ध्वस्त प्राचीन श्री विजयादुर्गा मंदिराची मूळ जागा ‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ संरक्षित वारसास्थळ म्हणून कह्यात घेतली होती. तथापि ही जागा गेली ११ वर्षे बेकायदेशीरपणे बळकावण्याचे प्रयत्न चर्च संस्थेने चालू केल्याचे कागदोपत्री सिद्ध झालेले आहे. चर्चचे हे कारस्थान उघडे पाडण्यासाठी, नेमकी सचित्र वस्तूस्थिती गोवाभर लोकांना कळावी, यासाठी पहिल्या टप्प्यात १० सहस्र पुस्तिकांचे गोवाभर वितरण करण्यात येऊन, दीर्घ मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. या प्रकरणी आवश्यकता भासल्यास न्यायालयाची दारे ठोठावण्याचा निर्णयही हिंदू रक्षा महाआघाडीने घेतलेला आहे.
आतापर्यंत गेली १० वर्षे या भूमी बळकावण्याच्या प्रकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेल्या गोवा सरकारवर जनशक्तीचे दडपण आणण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात जशी अयोध्या, तितकेच महत्त्वाचे हे सूत्र गोव्यात उचलून धरणार असल्याचे हिंदू रक्षा महाआघाडीने घोषित केले आहे.