१. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा आणि भाव
अ. ‘कु. मनस्वी शिक्षणासाठी बाहेरगावी रहात होती. तेव्हा तिला अकस्मात् तीव्र पायदुखीचा त्रास चालू झाला. त्याची तीव्रता इतकी होती की, तिला रात्रभर झोप येत नव्हती आणि जेवण जात नव्हते. तिने औषधोपचार घेऊनही तिचा त्रास दूर झाला नाही. तेव्हा तिने सद्गुरु नंदकुमार जाधव यांना नामजपादी उपाय विचारले. मनस्वीने सद्गुरु जाधवकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय नियमित केले. त्यामुळे काही दिवसांतच तिचा पायदुखीचा त्रास दूर झाला. ती नामजपादी उपाय करत असतांना तिला अनेक वेळा गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) सूक्ष्मातून दर्शन झाले. तेव्हापासून तिच्या गुरुदेवांप्रतीच्या भावात वृद्धी झाली.
आ. अशाच प्रकारचे त्रास मनस्वीच्या खोलीतील मुलींनाही झाले. तेव्हा त्या घरी गेल्या; मात्र मनस्वीने गुरुदेव आणि सद्गुरु काका यांच्यावर श्रद्धा ठेवून तिथेच राहून नामजपादी उपाय केले आणि ती त्रासातून बाहेर आली.
२. ती शिकवणीवर्गाला जातांना, तिथे गेल्यावर, तेथून परत येतांना, अभ्यासाला बसण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी प्रार्थना करत असे.
३. ‘वसतीगृहामध्ये मिळणारे भोजन हा प्रसाद आहे’, असा भाव ठेवून तो ग्रहण करणे
पूर्वी ती वसतीगृहातील जेवणाबद्दल गार्हाणे करत असे. नंतर ती ‘वसतीगृहात मिळणारे भोजन प्रसाद आहे’, असा भाव ठेवू लागली. त्यातून तिला आनंद मिळाला आणि तिची सकारात्मकताही वाढली.
४. स्वीकारण्याची वृत्ती
ती मार्च २०२४ या मासात इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी घरी आली होती. १०.२.२०२४ या दिवशी माझ्या सासर्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना भेटण्यासाठी घरी पुष्कळ पाहुणे येत असत. तेव्हा आम्हाला मनस्वीला वेळ देता येत नव्हता. तिने ही परिस्थिती स्वीकारली. तिने गुरुदेवांना प्रार्थना करून शरण जाऊन अभ्यास केला. गुरुकृपेने त्या परीक्षेत तिला पुष्कळ चांगले गुण मिळाले.
५. गुरुदेवांना अपेक्षित असे करण्याची तळमळ
तिला वैद्यकीय पूर्व परीक्षेत (‘नीट’मध्ये) ७२० पैकी ५७४ गुण मिळाले. तेव्हा अनेक जण तिला सांगत होते, ‘‘तू पुन्हा ही परीक्षा दे, म्हणजे तुला ‘एम्.बी.बी.एस्.’ या वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळेल; मात्र ती स्थिर आणि सकारात्मक होती. तिने सांगितले, ‘‘आपत्काळाच्या दृष्टीने आयुर्वेद शाखेत प्रवेश घेणे योग्य आहे. मला आयुर्वेद महाविद्यालयातच प्रवेश घ्यायचा आहे. त्या दृष्टीने गुरुकृपेने मला तेवढे गुण मिळाले आहेत. मी गुरुदेवांना अपेक्षित असेच करीन.’
– सौ. स्मिता नीलेश पाटील (कु. मनस्वीची आई), शेंदूरणी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव (३०.६.२०२४)
|