फोंडा, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी कु. अंजली सातनाळकर (वय १८ वर्षे) हिला रामनगर, बेळगाव येथे रहाणारे तिचे बाबा श्री. मीनाप्पा सातनाळकर यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. बाबा ३० फूट उंच असलेल्या झाडावरून जमिनीवर पडतांना त्यांना सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वरच्यावर हातांत घेऊन जमिनीवर ठेवल्याचे जाणवणे
‘६.६.२०२३ या दिवशी माझे बाबा (श्री. मीनाप्पा सातनाळकर, बेळगाव, वय ४८ वर्षे) घरासमोरील ३० फूट उंच असलेल्या झाडावर चढले होते. झाडाच्या डाव्या बाजूला रस्ता आणि उजव्या बाजूला दगडधोंडे होते. त्या झाडावरून बाबा जमिनीवर पडले. तेव्हा त्यांना जाणवले की, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी (गुरुदेवांनी) सूक्ष्मातून त्यांना वरच्यावर हातांत घेऊन जमिनीवर ठेवले आहे.’ परात्पर गुरुदेवांच्या कृपेने त्यांना अधिक काही दुखापत झाली नसल्याने ते त्वरित उठून चालू लागले.
२. बाबा झाडावरून पडल्यावर त्यांना दुखापत होऊनही आनंदी असणे आणि आईला गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी जाण्यास सांगून स्वतःही गुरुपौर्णिमेची सेवा बसून करणे
त्यानंतर बाबा झाडावरून पडल्याचे पू. गुंजेकरमामा (सनातनचे ५६ वे (समष्टी) संत पू. शंकर गुंजेकर) यांना समजले. तेव्हा त्यांनी बाबांना ‘निर्विचार’ हा नामजप करण्यास सांगितला. बाबांनी नामजप करण्यास चालू केल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. बाबांचे अंग पुष्कळ दुखत होते; पण ते त्यांनी कुणाला कळू दिले नाही. बाबा नेहमी आनंदी असत. ‘कधी एकदा प्रकृती बरी होऊन गुरुपौर्णिमेची सेवा चालू करू’, असे त्यांना वाटे. स्वतःला दुखापत होऊनही बाबांनी आईला गुरुपौर्णिमेची सेवा करण्यास पाठवले. आई सेवेला गेली की, बाबांना बरे वाटे. नंतर त्यांचे दुखणेही थोडे अल्प झाले. गुरुपौर्णिमेला २ – ४ दिवस असतांना बाबा म्हणायचे, ‘‘मला गुरुपौर्णिमेची सेवा करायची आहे. मला बसून काहीतरी सेवा द्या.’’ त्याप्रमाणे बाबा सेवेला गेले आणि त्यांनी बसून गुरुपौर्णिमेची सेवाही केली.
३. सद्गुरु स्वाती खाडये यांनी बाबांना ‘निर्विचार’ हा नामजप करण्यास सांगणे आणि बाबांच्या पायाचे शस्त्रकर्म टळणे
७.६.२०२३ या दिवशी मी आणि बाबा ‘क्ष’ किरण तपासणीसाठी (पायाचा एक्स-रे काढण्यासाठी) रुग्णालयात गेलो. तेव्हा तपासणीनंतर आधुिनक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘बाबांच्या पायाचे शस्त्रकर्म करावे लागेल.’’ तेव्हा आम्ही दोघे ‘शस्त्रकर्म करण्यासाठी आवश्यक रुपयांची जुळवणी करायला पाहिजे’, असा विचार करत घरी आलो. त्या वेळी सद्गुरु स्वाती खाडयेताई घरी आल्या होत्या. त्यांना बाबांची स्थिती सांगितल्यावर त्यांनी बाबांना ‘निर्विचार’ हा नामजप करण्यास सांगितले. सद्गुरु स्वातीताईंना भेटल्यावर बाबांची भावजागृती झाली. त्यांना जाणवले, ‘प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवच घरी आले आहेत आणि तेच त्यांना नामजप करण्यास सांगत आहेत.’ दुसर्या दिवशी आम्ही पुन्हा रुग्णालयामध्ये गेलो. त्या वेळी बाबांना प्रत्यक्ष परात्पर गुरुदेवच समवेत असल्याचे जाणवले. बाबांची पुन्हा तपासणी केल्यावर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘आता बाबांचे शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता नाही. औषधांनी सर्व ठीक होईल.’’ त्या वेळी ‘सद्गुरु स्वातीताईंच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनीच बाबांची काळजी घेतली’, असे मला जाणवले.
४. बाबांना गुरुसेवेची तीव्र तळमळ असणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवच सर्व सेवा करून घेतात’, असा भाव असणे
बाबा प्रत्येक दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करत असल्याने ‘आता दुखापत झाली आहे, तर त्यांच्या मनात सारखा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा कोण करणार ?’, असा विचार येत असे. बाबांमध्ये सेवेची अधिक तळमळ आहे. त्यांना कोणतीही सेवा सांगितली, तरी ‘मला सेवा जमणार नाही’, असे कधी ते म्हणत नाहीत. बाबांमध्ये कर्तेपणाही नाही. ते म्हणतात, ‘‘माझ्याकडून काहीच होत नाही. मी काहीच करत नाही. परात्पर गुरुदेवच मला शक्ती देतात आणि सर्व सेवा करून घेतात.’’
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनीच बाबांविषयी मोठी अनुभूती देऊन ती लिहूनही घेतली. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अंजली मीनाप्पा सातनाळकर (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२४)
|