साधकाने विचार केला पाहिजे की, ज्या महापुरुषांनी भगवंताच्या इच्छेवर स्वत:ला सोडून दिले आहे, त्यांच्या जीवनात कधी निरुत्साह आणि निराशा येते का ? ते कुठल्याही परिस्थितीत भगवंताखेरीज दुसर्या व्यक्तीला किंवा पदार्थाला स्वतःचे मानतात का ? त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भोगवासना शिल्लक रहाते का ? जर नाही, तर मग ‘आपणच बनवलेले दोष उपस्थित असतांना भगवंताच्या इच्छेचा बहाणा करून स्वतःच्या मनात खोटा संतोष मानणे किंवा आध्यात्मिक उन्नतीत दुसर्या व्यक्ती-परिस्थितीला बाधक समजणे, हे स्वत:ला अणि दुसर्यांना धोका देण्याखेरीज आणखी काय आहे ?’, असा विचार करून साधकाने हा निश्चय केला पाहिजे की, कुठलाही मनुष्य किंवा समाज कुणाच्याही साधनेत बाधा आणू शकत नाही. जेव्हाही मनुष्य तिच्या सन्मुख जातो, त्याच वेळी त्याचे हृदय भगवंताच्या कृपेने भरून जाते.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, मे २०२१)