सद्यःस्थितीत बिघडलेली कुटुंबव्यवस्था आणि दुरावलेली मने ठीक होण्याच्या दृष्टीने श्री. अशोक लिमकर (वय ७३ वर्षे) यांनी केलेले चिंतन !

श्री. अशोक लिमकर

१. बिघडलेली कुटुंबव्यवस्था आणि निर्माण झालेली तणावग्रस्त स्थिती

१ अ. एकत्र कुटुंबपद्धत बंद होऊन विभक्त कुटुंबपद्धत रुढ होणे आणि स्वकेंद्रित वृत्तीमुळे कुटुंबातील सदस्यांमधील संघभाव अन् जिव्हाळा लुप्त होणे : ‘आता पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धत बंद झाली आहे. २ – ३ जणांच्या विभक्त कुटुंबातही दिवसभर एकत्र रहाणे, मनमोकळेपणाने बोलणे, हसून गप्पागोष्टी करणे, विचारांची देवाण-घेवाण करून कुटुंबातील संघभाव, प्रेमभाव आणि आनंद वाढवणे, हे सर्व न्यून झाले आहे. ‘इतरांचा विचार करणे’ होतच नसल्याने जो तो स्वतःची नोकरी, कामधंदा, मित्र-मैत्रिणी, सहकार्‍यांशी बोलण्ो आदींमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे ‘कुटुंबातील सदस्यांशी बोलायला पाहिजे, त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, प्रेम आणि आनंद यांची देवाण-घेवाण केली पाहिजे’, याचे भान कुणालाच राहिलेले नाही. सदा सर्वकाळ भ्रमणभाषवर बोलणे आणि घर अन् कार्यालय यांच्या कामांत व्यस्त असणे, असेच चित्र घरोघरी दिसत आहे.

१ आ. पती-पत्नी दोघेही नोकरी करत असल्याने तणावपूर्ण जीवन जगत असणे आणि मनःशांती हरवून व्यक्तीचे स्वार्थी विचार बळावलेले असणे : पती-पत्नी दोघेही दिवसभर नोकरी करतात. मूलबाळ असेल, तर त्याला पाळणाघरात ठेवतात किंवा बाळाला सांभाळण्यासाठी एखादी बाई ठेवतात. दिवसभर घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवून सर्वांचीच अशी धावपळ चालू असते. त्यामुळे कुटुंबात ‘एकमेकांना समजून घेणे, इतरांचा विचार करून त्यांना साहाय्य करणे, मानसिक आणि अन्य प्रकारचा आधार देणे, इतरांना आनंद अन् प्रेम देणे यांचा विचारच होत नाही. प्रत्येक जण ताण-तणावाखालीच जगत असल्याने मनाची शांती ढळून जाते. व्यक्तीचा एकलकोंडेपणा वाढतो आणि स्वार्थी विचार बळावतात. त्यामुळे ‘प्रेमभाव, त्याग, सहजीवनाचा आनंद चाखणे’, यांचा त्यांना विसर पडतो. ताणामुळे जीवनातील आनंद हरवून नकारात्मकेचा आधार घेतला जातो. संयमाचा बांध तुटलेला असतो. अशा स्थितीत टोकाचे विचार केले जाऊन अविचाराने आणि घाईने चुकीचे निर्णय घेतले जातात.

१ इ. स्वकेंद्रित चाकोरीबद्ध जीवनामुळे परस्परांमधील संबंध बिघडून नात्यांत दुरावा निर्माण होणे आणि उद्विग्न जीवनाला सामोरे जावे लागणे : कुटुंबातील जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम नष्ट होऊन ‘घराला जणू एखाद्या ‘लॉजिंग’च्या खोलीचे रूपच प्राप्त झाले आहे. दिवसातील कोणत्याही वेळी घरी या, खा-प्या, झोपा आणि निघून जा ! प्रत्येकाने आपले वैयक्तिक दैनंदिन जीवन चाकोरीबद्ध बनवून ठेवले आहे. या चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर येऊन कौटुंबिक जीवनातील आनंद लुटण्याचा प्रयत्न कुणी करतच नाही. त्यामुळे परस्परांमधील संबंध बिघडून नाती दुरावतात. कधीतरी नात्यांची ताटातूटही होते, कुटुंबाची फारकत होते आणि व्यक्तीला नैराश्य येऊन उद्विग्न जीवनाला सामोरे जावे लागते.

२. ढासळती कुटुंबव्यवस्था पूर्ववत् करण्यासाठी उपाय

२ अ. एकमेकांशी छान जिव्हाळ्याची नाती असलेली आणि आदर्श पद्धतीने जीवन जगणारी कुटुंबे सिद्ध होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! : लवकरात लवकर यासाठी उपाय शोधावे लागतील. एकमेकांशी छान जिव्हाळ्याची नाती असलेली, गप्पागोष्टी करणारी, घर आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करून आदर्श पद्धतीने जीवन जगणारी कुटुंबे सिद्ध करावी लागतील. यासाठी विविध कार्यक्रम राबवून समाजाला उन्नत अवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

याविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कार्यविधी चालू केला आहे. आपणही त्या कार्याला गती देण्यासाठी थोडा हातभार लावायला हवा, तरच ‘एकमेकांकडून प्रेरणा घेऊन समाज पुढे पुढे जाईल’, यात शंका नाही. कुटुंबात चांगले पालट झाल्यास भारताची पुढील पिढी भारताचा समृद्ध आणि सशक्त पाया रचेल ! नाहीतर एका पिढीमागे दुसरी पिढी बरबाद होऊन जाईल आणि मनुष्याच्या जीवनात ‘राम’ उरणार नाही.

२ आ. आदर्श कुटुंब कसे निर्माण करावे ? : पुढील काही सूत्रे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. सर्वांनी त्याचा विचार करून प्रचार आणि प्रसार करूया, तरच काही सकारात्मक गोष्टी माणसाच्या हाती लागतील !

२ आ १. कुटुंबियांनी प्रतिदिन १ घंटा एकत्रितपणे घालवून इतरांना प्रेमाने आधार द्यावा ! : घरातील सर्वांनी प्रतिदिन किमान एक घंटा एकत्रितपणे घालवावा. या वेळी एकमेकांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीची चौकशी करावी. शाळा, तसेच कार्यालय येथील वातावरणाची माहिती घ्यावी. एकमेकांना समजून घेऊन मानसिक आणि प्रेमाचा आधार द्यावा. आठवड्याचे नियोजन, बैठे खेळ, अनुभव अन् विचार कथन, कलांचे सादरीकरण इत्यादी कार्यक्रम, ज्यांमध्ये सर्वांचा सहभाग असेल, असे कार्यक्रम घ्यावेत.

२ आ २. सुसंस्कारांचे संवर्धन : प्रतिदिन संध्याकाळी सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना, भजन आणि नामस्मरण करावे. मुलांना भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगून ‘त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार होतील’, असे प्रयत्न करावेत. ‘मुलांमध्ये ‘नम्रता’, ‘मोठ्यांचा आदर करणे’, ‘आदरातिथ्य करणे’, यांसारखे भारतीय संस्कार अन् गुण यांची वाढ, तसेच संवर्धन होईल’, असे पहावे.

२ आ ३. कामांचे सुनियोजन : घरातील सर्व कामे सर्वांनी वाटून घ्यावीत. एकमेकांची कामे लवकर होण्यासाठी त्यांना हातभार लावल्यास आपलेपणा, प्रेमभाव आणि त्यागाची भावना वाढायला साहाय्य होईल !

२ आ ४. भोजन : घरातील सर्वांनी रात्रीचे भोजन एकत्र बसून करावे. या वेळी दूरचित्रवाणी संच (टी.व्ही.), तसेच भ्रमणभाष (मोबाईल) बंद करून ठेवावा.

२ आ ५. इतरांशी आदरपूर्वक वागणे : स्वच्छता कर्मचारी, वर्तमानपत्रे आणि दूध यांचे वाटप करणारे, भाजीविक्रेते आदींचा, जे आपल्याला नियमित भेटतात, त्यांचा आदर करावा. त्यांची विचारपूस करावी. त्यांना घरातील कार्यक्रमांचे निमंत्रण द्यावे.

२ आ ६. अन्य कुटुंबांशी मैत्री करून सुख-दुःखाची देवाण-घेवाण करणे : आपल्याला आवडणारी २ – ४ कुटुंबे निवडून त्यांच्याकडे येणे-जाणे चालू ठेवावे. प्रतिमास किमान एकदा तरी त्यांच्या घरी सहपरिवार सहज जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, असे करावे. अशा नियमित भेटींमुळे सुख-दुःख वाटता येऊन एकमेकांना साहाय्य करण्याचा भाग वाढतो आणि अडचणी सुटण्यासही साहाय्य होते.

३. आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने घ्यावयाची काळजी

३ अ. प्राणायाम, योगासने, व्यायामादी करणे : प्रतिदिन स्नान, प्राणायाम, योगासने, व्यायाम इत्यादी करावे आणि इतरांनी करावे, यांसाठी आग्रही रहावे. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’, म्हणजे ‘धर्माचरणासाठी शरीर हेच प्रथम साधन आहे’, म्हणजेच ‘साधनेसाठी शरीर चांगले असणे उपयोगाचे आहे’, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

३ आ. लंघन (उपवास) : १५ दिवसांतून येणार्‍या एकादशीचे निमित्त करून अल्पाहार घेऊन लंघन करावे. (उपवास करावा)

३ इ. अभ्यंगस्नान : आठवड्यातून किमान एकदा तरी सर्वांनी अभ्यंगस्नान करावे.

३ ई. प्रतिमास एकदा पोट साफ होण्यासाठी एरंडेल अथवा त्रिफळा चूर्ण घ्यावे.

३ उ. भारतीय अन्न ग्रहण करणे : भोजन करतांना भारतीय भोजनपदार्थच खावेत. ऋतूचक्रानुसार त्यामध्ये पालट करावा. स्वतः शास्त्र समजून घेऊन पुढील पिढीला आहाराचे महत्त्व समजावून सांगावे.’

– श्री. अशोक लिमकर (वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.८.२०२४)


कुटुंबियांवर सुसंस्कार होण्याच्या दृष्टीने करावयाच्या काही कृती


१. देवदर्शनाला जाणे :
३, ६ किंवा ९ मासांनी सर्वांनी एकत्रितपणे कुलदेवता किंवा अन्य देवता यांच्या दर्शनाला जावे.

२. रूढी आणि परंपरा यांचे श्रद्धेने पालन करणे : हिंदु धर्मशास्त्र समजून घेऊन सर्व रूढी आणि परंपरा यांचे श्रद्धेने अवश्य पालन करावेत. मुलांना त्यामागील शास्त्र समजावून सांगावे.

३. कार्यक्रमांत भारतीय वेशभूषा परिधान करणे : वर्षातील सर्व सणवार, तसेच महत्त्वाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतांना न चुकता भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान करावी. मुला-बाळांना त्याचे महत्त्व सांगून त्यांच्यामध्ये याची आवड निर्माण करावी.

४. चैतन्यमय मातृभाषेत बोलणे : प्रत्येकाने स्वतःच्या शुद्ध मातृभाषेत बोलावे. अन्य कोणत्याही भाषांपेक्षा स्वभाषेत अधिक चैतन्य असून त्यामधून ज्ञानग्रहण चांगले होते.

– श्री. अशोक लिमकर (२.८.२०२४)

संपादकीय भुमिका

सद्यःस्थितीत बिघडलेली कुटुंबव्यवस्था योग्यरित्या पुन्हा आणण्यासाठी सर्वांना नैतिकता आणि धर्मशिक्षण द्यायला हवे !