(दहीहंडी फोडणार्यांना गोविंदा म्हणतात)
मुंबई / ठाणे – येथे विविध ठिकाणी दहीहंडी फोडतांना १२९ गोविंदा घायाळ झाले. यातील १९ गोविंदांना सरकारी आणि खासगी रुग्णालयांत भरती करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. के.ई.एम्. रुग्णालयात भरती केलेल्या २ गोविंदांची प्रकृती गंभीर आहे. कुणाल पाटील (वय २० वर्षे) याच्या पाठीच्या मणक्याला, तर मनू खारवी (वय २५ वर्षे) याच्या डोक्याला मार लागला आहे. घायाळ झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. महंमद झमीर शेख (वय ६ वर्षे) हा सोसायटीतील दहीहंडी फोडतांना पडून घायाळ झाला. त्याच्या डाव्या हाताचा अस्थीभंग झाला आहे. यश वाघेला (वय ११ वर्षे) वरून पडल्याने त्याच्या दंडाचा अस्थीभंग झाला. या दोघांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आयोजकांकडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन !बर्याच गोविंदा पथकांनी पारितोषिके मिळवण्यासाठी १४ वर्षांखालील मुला-मुलींना सहभागी करून घेतले होते. प्रत्यक्षात न्यायालयाच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या सहभागाला प्रतिबंध केला होता; पण हा नियम आयोजकांनी डावलला. (या प्रकरणी संबंधित आयोजकांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक) उत्सवस्थळी तैनात असणार्या पोलिसांनीही संबंधित पथकांवर कारवाई केली नाही. (न्यायालयाचा अवमान होत असल्याचे दिसूनही कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक) |
संपादकीय भूमिका
|