Om Mountain : उत्तराखंडमधील ओम पर्वतावरील ‘ॐ’ चिन्‍ह विलुप्‍त झाले !

जागतिक तापमान वाढ अथवा हिमालयीन क्षेत्रात वाढलेली विकासकामे कारणीभूत असल्‍याचा दावा !

ओम पर्वत

देहराडून (उत्तराखंड) – राज्‍यातील पिथोरागड येथील धारचुला तालुक्‍यात असलेला व्‍यास खोर्‍यात ओम पर्वत उभा आहे. ५ सहस्र ९०० मीटर उंचीच्‍या या पर्वताचे वैशिष्‍ट्य असे की, या पर्वतावर ‘ओम’ आद्यांक्षराची विलोभनीय आकृती दिसते. गेल्‍या सहस्रावधी वर्षांपासून हा पर्वत अस्‍तित्‍वात असल्‍याचे मानले जाते. पांढर्‍या शुभ्र बर्फाच्‍छादित पर्वतातील हे ओम चिन्‍ह कोट्यवधी हिंदूंच्‍या श्रद्धेचा विषय असला, तरी यंदा जागतिक तापमानात वाढ झाल्‍याने या पर्वतावरील बर्फ अधिक प्रमाणात वितळल्‍याने ‘ओम आकृती’ विलुप्‍त झाली आहे.

१. पर्यावरणवादी आणि स्‍थानिक यांचे म्‍हणणे आहे की, हे नैसर्गिक कारणांमुळे घडले आहे. हिमालयातील क्षेत्रात होत असलेल्‍या विकासकामांमुळे हा प्रकार घडला, असे अन्‍य काही जणांचे मानणे आहे.

२. या प्रकरणाची चौकशी करण्‍याची मागणी श्रद्धाळूंनी केली आहे. सरकारने या घटनेची चौकशी चालू केली आहे. पर्वतावर पुन्‍हा ‘ओम’ कसा परत येईल, या दिशेने पावले उचलली जात आहेत.

३. लोकांना आशा आहे की, नव्‍या मोसमात येथे पुन्‍हा बर्फ पडून ‘ओम’ उमटेल.

४. कैलास मानसरोवरच्‍या यात्रेच्‍या वेळी नाभीढांगवरून हा पर्वत भाविकांना आपले दर्शन देतो.

संपादकीय भूमिका

दोन्‍ही दाव्‍यांत तथ्‍य असू शकते. अर्थात् दोन्‍ही दाव्‍यांतून मानवी हस्‍तक्षेप हेच कारण पुढे येते. थोडक्‍यात वैज्ञानिक विकासामुळे हिंदु धर्माची म्‍हणजेच मानवाची हानी कशी होत आहे, याचे हे आणखी एक उदाहरण !