दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कोथिंबिरीची मोठी जुडी २४० रुपयांना !; ‘टी.आय.एस्.’मधील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू…

कोथिंबिरीची मोठी जुडी २४० रुपयांना !

नाशिक – जिल्ह्यात चालू असलेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक प्रचंड घटली आहे. परिणामी भाज्यांच्या दरांवरही त्याचा परिणाम झाला. कोथिंबिरीची जुडी तब्बल २४० रुपयांपर्यंत गेली आहे. मेथी, शेपू, कांदापात, पालक आदी सर्वच पालेभाज्या काही प्रमाणात महागल्या.


‘टी.आय.एस्.’मधील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

मुंबई – ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या संस्थेमधील मूळ लखनौ येथील अनुराग जैस्वाल या २९ वर्षीय विद्यार्थ्याचा मुंबईतील चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला. येथे मानव संसाधन कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. २३ ऑगस्टच्या रात्री वाशी येथे एका मेजवानीला गेला होता. त्या ठिकाणी १०० पेक्षा अधिक विद्यार्थी होते. तिथून आल्यावर तो उठलाच नाही. मित्रांनी रुग्णालयात भरती केल्यावर तो मृत आढळला.


सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबईत मुली असुरक्षित !

मुंबई – ओशिवरा परिसरात ३७ वर्षीय सुरक्षारक्षकाने १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. मुलीला प्रसाधनगृहात नेऊन त्याने हे कृत्य केले. मुलीने पोलीस ठाण्यात धाडसाने तक्रार नोंद केल्यावर त्यालो पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

नांदेड – दीर्घ आजाराने नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २ दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यावर वयाच्या सत्तरीत २०२४ मध्ये लोकसभेत निवडून आले होते. सरपंचपदापासून त्यांनी राजकीय कारकीर्द चालू केली होती.’