उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे झाडे तोडल्याचा आरोप !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – कचरा डेपोचा ‘बफर झोन’ (अतिरिक्त जागा) असतांनाही मोशीतील गायरान जागेवरील शेकडो झाडे तोडण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे शेकडो झाडे तोडली असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. वृक्षतोडीमुळे कचरा डेपोतील निसर्ग उघडा पडला आहे. कचरा डेपोचा नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पर्यावरण विभागाने वृक्ष लागवड करून ‘बफर झोन’ सिद्ध केला होता. त्या शेजारील गायरान जागेवर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली होती; पण बेसुमार वृक्षतोड करण्यात आली. गायरान जागेवरील जुनी झाडे तोडल्याने परिसरातील पक्ष्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. मोशी कचरा डेपो लगत सिद्ध केलेल्या ‘बफर झोन’मध्येही वृक्ष लागवड करण्यात आली होती.
त्या जागेवर अवैध उत्खननही चालू असून मुरुमाची चोरी !
पर्यावरणप्रेमी श्री. प्रशांत राऊळ यांनी सांगितले की, गायरान जागेवरील झाडे कुणाच्या संमतीने तोडली ? तेथे अवैध उत्खननही चालू असून मुरुमाची चोरी होत आहे. ही अवैध वृक्षतोड आणि उत्खनन केल्याचे पंचनामे व्हावेत. संबंधितांवर गुन्हा नोंद करावा, याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे तक्रार केली आहे.
संपादकीय भूमिका
|