पेडणे, २२ ऑगस्ट (वार्ता.) – पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी २२ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पेडणे बाजारात एकत्र येऊन आंदोलन केले. ‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पेडणे येथे येऊन आमच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही’, अशी चेतावणी देत टॅक्सी व्यावसायिकांनी आंदोलन चालूच ठेवले आहे.
टॅक्सी व्यावसायिकांनी मोपा विमानतळावर स्थानिकांना विनामूल्य टॅक्सी कक्ष (काऊंटर) उपलब्ध करून देणे, शेतकर्यांना योग्य मोबदला देणे, अनधिकृत व्यवसाय करणार्यांवर कारवाई करणे, ‘मोटर वाहन कायदा २००५’ची कार्यवाही करणे, विमानतळावर जाण्यासाठी पूर्वीचा रस्ता चालू ठेवणे, ‘मोपा जोडरस्त्यावर (‘लिंक’रस्त्यावर) टोल न आकारणे आदी मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. राज्यातील विविध सामाजिक कार्यकते, विविध पक्षांचे नेते आदींनी आंदोलनस्थळी एकत्र येऊन टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या आंदोलनाची गंभीर नोंद घेऊन याविषयी २३ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२ वाजता एक बैठक बोलावली आहे. देहली दौर्यावर असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याविषयी प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘टॅक्सी व्यावसायिक अकारण आंदोलन करत आहेत. वास्तविक टॅक्सी व्यावसायिकांसाठी मोपा विमानतळावरील शुल्क २०० रुपयांवरून ८० रुपये केले आहे.’’