उद्या १९.८.२०२४ या दिवशी रक्षाबंधन आहे. त्या निमित्ताने…
‘बहीण-भाऊ यांचे नाते जपणारा विधी म्हणजे रक्षाबंधन ! प्राचीन काळापासून रक्षाबंधन होत आहे; मात्र रक्षाबंधनाचे महात्म्य काय ? रक्षाबंधनाविषयी पुराणात काय आख्यायिका आहे ? सांप्रतकाळामध्ये या रक्षाबंधनाच्या वेळी कोणते मुहूर्त पहावेत, तसेच कोणत्या वेळा टाळाव्यात ? यांविषयी वेगवेगळ्या प्रसिद्धीमाध्यमातून वेगवेगळे लेख येत असतात. या लेखात रक्षाबंधनाविषयी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली माहिती दिली आहे.
१. रक्षाबंधनाचे महात्म्य
रक्षाबंधन केल्याने ज्याला राखी बांधणार त्या मनुष्याचे भूत, प्रेत आणि पिशाच यांच्यापासून रक्षण होते. या बंधनामुळे सर्व रोग आणि अशुभत्व यांचा नाश होतो. हे बंधन रक्षणासह विजय, सुख, पुत्र-पौत्र, धन अन् आरोग्य देते, असे वर्णन ‘व्रतराज’ नामक ग्रंथात आढळते.
२. रक्षाबंधनाची कथा
‘व्रतराज’ ग्रंथामध्ये रक्षाबंधनाविषयी पुढील कथा आढळते. एकदा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले, ‘‘हे केशव, ज्यायोगे भूत, प्रेत, पिशाच यांपासून रक्षण होते, तसेच सर्व रोगादिकांचा नाश होतो आणि अशुभत्वाचे निरसन होते. एकदा हे बंधन केले की, वर्षभर रक्षण होते, असे रक्षाविधान मला सांगा.’’ त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘‘हे पांडवशार्दुल (युधिष्ठिर), इंद्राचा विजय व्हावा, यासाठी इंद्राणीने प्राचीन काळामध्ये त्याला असेच रक्षाबंधन केले होते. देव आणि असुर यांचे १२ वर्षे युद्ध चालू होते. त्या युद्धात असुरांनी देवांसहित इंद्रावरही विजय मिळवला होता. तेव्हा इंद्राने देवगुरु बृहस्पति यांना बोलावून सांगितले, ‘‘त्रस्त झालेला मी पलायन करू शकत नाही अन् या ठिकाणी थांबूही शकत नाही. त्यापेक्षा मी थेट युद्धालाच प्रारंभ करतो.’’ यावर बृहस्पति म्हणाले, ‘‘हे इंद्र, क्रोधाचा त्याग कर. ही वेळ युद्धासाठी पोषक नाही. जो काळ एखाद्या कार्यासाठी योग्य नाही, अशा काळात केलेले कार्य यशस्वी कसे होईल ? उलट असे केल्याने भयंकर अनर्थ घडेल.’
त्यांचे संभाषण चालू असतांनाच शची (इंद्राणी) इंद्राला म्हणाली, ‘‘हे देव, आज चतुर्दशी आहे. उद्या प्रातःकाळ झाल्यावर मी मंगलस्नान इत्यादी करून आपल्याला रक्षाबंधन करते, ज्याने तुमचा विजय होईल.’’ असे सांगून पौर्णिमेच्या दिवशी शचीने इंद्राच्या उजव्या हाताला रक्षापोटली (राखी) बांधली. ब्राह्मणांच्या मंगलघोषात रक्षाबंधन करून घेतलेला इंद्र ऐरावतावर आरूढ होऊन असुरांवर विजय मिळवण्यासाठी युद्धावर गेला. इंद्राला पाहून सर्व राक्षस भयभीत होऊन पराजित झाले. शचीने केलेल्या रक्षाबंधनाने इंद्र आणि देवगण यांचा विजय झाला. ही कथा युधिष्ठिराला सांगून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘‘या रक्षाविधानाने मनुष्याला विजय, सुख, पुत्र-पौत्र, धन आणि आरोग्य प्राप्त होते.’’
३. रक्षाबंधन कधी करावे ?
‘रक्षाबंधन कधी करावे ? आणि ते करतांना विशेषत्वाने कोणत्या वेळा टाळाव्यात ?’, याविषयी अनेक ग्रंथात संदर्भ आढळतात. त्याचा सारासार विचार करून ‘यंदा येणार्या राखीपौर्णिमेला कोणत्या वेळी राखी बांधावी ?’, याविषयी माहिती दिली आहे. ‘रक्षाबंधन भद्रारहित अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपराहृकाली किंवा प्रदोषकाली करावे’, असे ‘धर्मसिंधु’ नामक ग्रंथात आढळते. त्यामुळे या वर्षी १९.८.२०२४ या दिवशी अपराहृकाली आणि प्रदोषकाली म्हणजे सूर्यास्तानंतर साधारण अडीच घंटे, म्हणजेच यापैकी कोणत्याही एका काळात रक्षाबंधन करावे. ज्यांना या काळात रक्षाबंधन करणे शक्य नाही, त्यांनी दुपारी २ नंतर दिवसभरात कधीही रक्षाबंधन करण्यास आडकाठी (हरकत) नाही.
४. रक्षाबंधन कधी करू नये ?
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी दुपारी सुमारे १.३३ पर्यंत विष्टी करण आहे. ‘विष्टी करण (भद्रा) चालू असतांना रक्षाबंधन केल्यास हे नाशाला कारणीभूत होते’, असे ‘निर्णयसिंधू’ ग्रंथात आढळते. त्यामुळे १९.८.२०२४ या दिवशी दुपारी १.३३ वाजेपर्यंत राखी बांधणे सर्वथा निषिद्ध आहे.
५. रक्षाबंधनाची प्राचीन काळची आणि आताची कार्यपद्धत
‘प्राचीन काळी ‘रक्षापोटलिका’, म्हणजेच एका कापडाच्या तुकड्यावर स्वच्छ तांदूळ, पांढरी मोहरी आणि सुवर्ण असे एकत्रित घेऊन त्याची पोटली बांधली जात असे अन् रेशमी धाग्याच्या साहाय्याने हे बांधले जात होते’, असे संदर्भ ‘निर्णयसिंधु’ आणि ‘व्रतराज’ या ग्रंथात आढळतात. हे रक्षाबंधन विजयाच्या कामनेने पती-पत्नी, बहीण-भाऊ इत्यादिकांमध्ये होत असे. सांप्रत मात्र रक्षाबंधन बहीण-भावामध्ये करण्याची परंपरा रुढ आहे, तसेच पोटलिकाऐवजी विशिष्ट मणी किंवा अन्य शुभ आणि मंगलकारक प्रतीक धाग्याद्वारे बांधले जातात.
येन बद्धो बलि राजा दानवेन्द्रो महाबलः।
तेन त्वां अभिबध्नामि रक्षे माचल माचल।।
अर्थ : ज्या रक्षाविधानाने अतिशय बलवान असलेला दानवांचा राजा बली बांधला गेला, त्याच रक्षाविधानाने मी तुला बांधते. हे रक्षे (रक्षादेवी), तू सर्व प्रकारे अचल (स्थिर) हो.’ (८.८.२०२४)
– श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन वेदपाठशाळा, गोवा.