दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कल्याणमध्ये बस थांब्यावर चोरी !; सट्टा बाजारातून लाभ मिळवण्याचे आमीष दाखवून फसवणूक !…

कल्याणमध्ये बस थांब्यावर चोरी !

कल्याण – कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रस्त्यावरील ‘वाशी बस थांबा’ येथे काही प्रवासी वाशी बसमध्ये चढत होते. या वेळी तीन जण बसमध्ये चढत असतांना त्यांनी एका प्रवाशासमवेत वाद घातला आणि त्याचा १२ सहस्र रुपये किमतीचा भ्रमणभाष हिसकावून पळून गेले. (अशा चोरांना पकडून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)


सट्टा बाजारातून लाभ मिळवण्याचे आमीष दाखवून फसवणूक !

पनवेल – खारघर येथील बांधकाम व्यावसायिकाने ‘सट्टा बाजारात गुंतवणूक करा आणि भरघोस नफा कमवा’ या विज्ञापनाला भुलून १६ जानेवारी ते ८ ऑगस्ट या कालावधीत १३ कोटी ५६ लाख ४४९ रुपयांची गुंतवणूक केली. अनेकदा परतावा मागूनही तो न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी संबंधित ४ अज्ञात आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला.

संपादकीय भूमिका : अशी फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई कधी होणार ?


मासेमारीत होणार अंतराळ संशोधनातील तंत्रज्ञानाचा वापर !

मुंबई – अंतराळ संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मासेमारी करतांना होणार आहे. समुद्रात जातांना हवामान, समुद्राची खोली, वार्‍याचा वेग, मासेमारीसाठी अनुकूल भाग, संकटाच्या वेळची सूचना यांसंदर्भात माहिती मासेमारांना मिळेल. राज्यात कार्यरत मासेमारी करणार्‍या नौकांवर ११ सहस्र ९६० ‘ट्रान्सपाँडर्स’ (सिग्नल प्राप्त होणारे उपकरण) बसवले जाईल, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी दिली.


नागपूरहून मुंबई आणि पुणे येथे विशेष रेल्वे गाड्या !

अकोला – आगामी काळातील सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते पुणे या मार्गावर विशेष रेल्वे गाड्यांच्या फेर्‍या असतील.


मुंबईत चारचकीने दोघांना चिरडले !

मुंबई – वर्साेवा समुद्रकिनार्‍याजवळ चारचाकीने २ जणांना चिरडले. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती घायाळ आहे. याप्रकरणी चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आहे.  करण्यात आला आहे. याप्रकरणी चालक आणि त्याच्यासमवेत असणार्‍याला अटक करण्यात आली असून दोघांनी मद्यसेवन केले होते का ?, याची चाचणी कररण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका : सर्वत्रचे वाढते अपघाती मृत्यू चिंताजनक !