मुलुंडमध्ये बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारणार्‍या दोघांना अटक !

नागपूर – सायबर गुन्हेगारांच्या टोळीने मुलुंडमध्ये बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारले. नागपूर पोलिसांच्या बनावट ई-मेलवरून बँकांना संपर्क करून ग्राहकांची खाती गोठवली. पोलीस असल्याचे खोटे सांगून पैसे उकळले. देशभरात सहस्रो कोटी रुपयांची फसवणूक करणारे शुभम पितांबर शाहू (वय २६ वर्षे) आणि प्रद्मुम्न अनिल सिंह (वय ३२ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली.

१. शुभम तेथे बनावट पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. त्याला इंस्टाग्रामवर सक्रीय असणारे सायबर गुन्हेगार बँक खात्याचे क्रमांक देऊन ती खाती  गोठवायला सांगायचे.

२. शुभम ‘नागपूर सायबर पोलीस’ या नावाने बँकेला बनावट ई-मेल करत असे. बँक व्यवस्थापकही पोलिसांचा ई-मेल समजून संबंधित ग्राहकांचे खाते गोठवत होते.

३. त्यानंतर शुभम सायबर पोलीस ठाण्याचा निरीक्षक असल्याचे सांगून ग्राहकांना संपर्क करत असे. ‘तुमच्या खात्यात जमा पैसे हे आतंकवादी संघटनांचे किंवा गंभीर गुन्ह्यांतील आहेत’, असे खोटे सांगायचा. ग्राहक घाबरल्यावर त्याचा अपलाभ घेत शुभम त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत होता.

४. नागपूर येथील दत्तवाडीच्या आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक श्वेत कुमार यांना बनावट ई-मेल आला. त्यांनी याचा छडा लावल्यावर वरील प्रकार उघड झाला.

‘यू ट्यूब’वरून सायबर गुन्हेगारीचे धडे घेतले !

शुभम शाहू ओडिशाचा असून तो बारावी अनुत्तीर्ण, तर प्रद्युम्न दहावी अनुत्तीर्ण आहे. शुभमने ‘यू ट्यूब’वरून सायबर गुन्हेगारीचे धडे घेतले. त्यातून त्याची सायबर गुन्हेगारांशी ओळख झाली. फसवणूक करून तो काही महिन्यांतच कोट्यधीश झाला.

संपादकीय भूमिका

  • कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या संबंधितांकडून हे पैसे वसूल करायला हवेत !
  • ऑनलाईन माध्यमांतून गुन्हेगारी आत्मसात् केली जाणे, हे चिंताजनक आहे ! सरकार यावर कसे नियंत्रण मिळवणार ?