(‘युनेस्को’ म्हणजे संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था)
मुंबई – जागतिक वारसास्थळांमध्ये ‘लष्करी भूप्रदेश’ या सूचीत समावेश व्हावा, यासाठी महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडूमधील १ अशा १२ गड-दुर्गांची माहिती भारत सरकारकडून जानेवारी २०२२ मध्ये युनेस्कोला पाठवण्यात आली होती. याविषयी पहाणी करण्यासाठी युनेस्काचे पथक सप्टेंबर २०२४ मध्ये भारतात येणार आहे. युनेस्कोच्या पथकाच्या अहवालानंतर या गड-दुर्गांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्याची पुढची प्रक्रिया चालू होणार आहे. महाराष्ट्राच्या राज्य पुरातत्व विभागाकडून याविषयीची माहिती युनेस्कोच्या पथकापुढे सादर केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांमध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड, तर तमिळनाडूमधील जिंजी या सर्वांची माहिती युनेस्कोला पाठवण्यात आली होती. १७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासनकाळात या गडांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला.
सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खन येथील पठारांवर असलेल्या या गडांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. आतापर्यंत भारतातील ४२ आणि त्यांत महाराष्ट्रातील ६ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या या सूचीत आहे.