मुंबई – पान-मसाल्याची विज्ञापने करणारे लोक मृत्यू विकतात. जे लोक ‘फिटनेस’विषयी (शारीरिक सक्षमतेविषयी) बोलतात, तेच पान-मसाल्याचा प्रचार करतात. पान-मसाला उद्योगाची वार्षिक उलाढाल ४५ सहस्र कोटी रुपये आहे. हे तुम्हाला माहीत आहे का ? याचा अर्थ सरकारही या उद्योगाला पाठीशी घालत आहे. तुम्ही मृत्यू विकताय. तुम्ही कसे जगू शकता ?, असे सडेतोड वक्तव्य हिंदी चित्रपट अभिनेते जॉन अब्राहम यांनी रणवीर अलाहाबादिया यांना दिलेल्या मुलाखतीत केले.
१. पान-मसाल्याची विज्ञापने करणार्या कलाकारांविषयी ते म्हणाले, ‘‘जर मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे जगलो आणि मी जे बोलतो ते आचरणात आणले, तरच मी एक आदर्श व्यक्ती आहे; पण मी लोकांसमोर स्वत:चे एक वेगळेच रूप दाखवत असेन आणि नंतर एक वेगळीच व्यक्ती असल्यासारखे वागत असेन, तर लोक ते कधी ना कधी ओळखतील. मी कधीच मृत्यू विकणार नाही.’’
२. चित्रपट अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान, टायगर श्रॉफ पान-मसाल्याचे विज्ञापन करतात, तर अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी टीकेनंतर अशा विज्ञापनांमधून काढता पाय घेतला. अक्षय कुमार याने या संदर्भात क्षमाही मागितली होती.