चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे जप्त !

अनेकांकडे अवैध शस्त्रे असल्याचे समोर !

प्रतिकात्मक चित्र

चंद्रपूर – छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि बिहार या ३ राज्यांतून मोठ्या प्रमाणात बंदुका, काडतुसे आणि तलवारी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात येत असल्याची पोलिसांची माहिती आहे. पोलिसांनी लखमापूर येथे दीपक उमरे आणि विक्रम जुनघरे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केली आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंदुका, काडतुसे, तलवारी तथा इतर शस्त्रे सर्रास मिळत आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या म्हणण्यानुसार शस्त्रे वर्ष २०२१-२२ या कालावधीतच जिल्ह्यात आली आहेत. (जर पोलिसांना जिल्ह्यात पूर्वीच शस्त्रे आली आहेत, हे ठाऊक होते, तर त्याच वेळी धडक कारवाई का केली नाही ? – संपादक) अवैधरित्या शस्त्र बाळगणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई चालू केली आहे.

१. जुलै महिन्यात येथे ३ गोळीबारीच्या घटना, पेट्रोल बाँब मिळणे आणि हत्याकांड अशा घटना घडल्या. युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रांत सहारे यांच्या घरून ४० जिवंत काडतुसे आणि तलवारी जप्त करण्यात आल्या. शस्त्रांच्या अवैध तस्करीत युवा राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे.

२. आतापर्यंत २२ जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे, तर येत्या काही महिन्यात आणखी काही जणांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. यापूर्वी बल्लारपूर, राजुरा, माजरी आणि चंद्रपूर शहरात बंदुका बाळगणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.

३. जिल्ह्यात रेती, कोळसा, तंबाखू, गुटखा, देशीविदेशी दारू तस्करी आणि ऑनलाईन क्रिकेट सट्टा आदी अवैध कामे करणार्‍यांकडे बंदुका, तलवारी आणि इतर शस्त्रे आहेत. काही तस्करांनी तर गुन्हेगारांच्या टोळ्याच निर्माण केल्या आहेत, अशीही चर्चा असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

संपादकीय भूमिका :

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे सापडणे, ही धोक्याची घंटा समजून प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक !