भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना उच्च न्यायालयाने खडसावले !

संजय राठोड यांच्याविरोधातील याचिका मागे घेण्याची मागणी केल्याचे प्रकरण !

चित्रा वाघ आणि संजय राठोड

मुंबई – पुणे येथील पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्यासमवेत होते आणि महाविकास आघाडीचे मंत्री होते. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असून महायुतीमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधातील याचिका मागे घेण्याची मागणी केली. अशा प्रकारे राजकारणासाठी न्यायालयात याचिका करण्यात आल्याचे निदर्शनास येताच न्यायालयाने चित्रा वाघ यांना खडसावले.

‘राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. न्यायालयांना त्यात विनाकारण ओढले जात आहे. राजकारण करण्याचा हा मार्ग नाही आणि तो कधीही स्पृहणीय नाही’, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपिठाने चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले.