‘माझ्या गुडघ्याचे शस्त्रकर्म पुणे येथील रुग्णालयात झाले. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. गुडघ्याचे शस्त्रकर्म पुणे येथे करण्याचे ठरवणे
माझे गुडघे आतून पुष्कळ घासले गेले होते. मला चालतांना पुष्कळ वेदना होत होत्या; परंतु भीतीमुळे मी शस्त्रकर्म करण्याचे टाळत होते. जानेवारी २०२४ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मला शस्त्रकर्म करून घेण्याचे सुचवले. त्यामुळे मला धीर आला. मी पुणे येथे माझ्या दोन्ही गुडघ्यांचे शस्त्रकर्म करण्याचे ठरवले. मला मधुमेह असल्यामुळे आधुनिक वैद्यांनी एका गुडघ्याचे शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला.
२. मला मज्जातंतूचा (Neuron) त्रास असल्याने शस्त्रकर्म करून घ्यायला भीती वाटत होती.
३. ‘शस्त्रकर्म होतांना भावजागृतीचे प्रयत्न केल्याने शस्त्रकर्म कधी झाले’, हे लक्षात न येणे
मी शस्त्रकर्माच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना प्रार्थना करत होते. मला कमरेच्या खाली भूल दिली होती. त्या वेळी मी ‘वेदना होत असलेल्या ठिकाणी श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र फिरत आहे’, असा भाव ठेवला. नंतर मी डोळे मिटून शांतपणे नामजप करू लागले. आधुनिक वैद्यांनी ‘शस्त्रकर्म पूर्ण झाले’, असे सांगितल्यावर मी भानावर आले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘ईश्वर शस्त्रकर्म करणार्या आधुनिक वैद्यामध्ये आहे. ईश्वरच सर्वकाही करत असतो.’
४. साधिकेच्या मुलीने तिची मनोभावे सेवा करणे
मी रुग्णालयातून घरी आल्यावर माझी मुलगी सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४० वर्षे) माझी मनोभावे सेवा करत होती. तिच्यातील स्थिरता आणि धैर्य पाहून मला पुष्कळ आनंद होत होता. त्या आनंदात मी माझ्या सर्व वेदना सहन करू शकले.
५. पुणे येथील अन्य एका साधिकेने साधिकेची भावपूर्ण सेवा करणे
पुणे येथील एका साधिकेने माझी भावपूर्ण सेवा केली. ‘गुरुदेवांच्या कृपेने सर्वकाही होत आहे’, याची मला जाणीव होऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती.
६. देहत्याग केलेल्या संत यजमानांनी स्वप्नात येऊन धीर देणे अन् सनातनच्या तिन्ही गुरूंच्या कृपेमुळे त्रास सहन करू शकणे
वर्ष २०२१ मध्ये माझ्या यजमानांनी (सनातनचे १०७ वे संत पू. डॉ. नंदकिशोर वेद यांनी) देहत्याग केला. तेव्हापासून ते माझ्या कधीही स्वप्नात आले नव्हते. माझ्या शस्त्रकर्मानंतर ते माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला धीर दिला. त्यामुळे मी त्रास सहन करू शकले. सनातनच्या तिन्ही गुरूंच्या कृपेमुळे मी शस्त्रकर्माच्या वेदना सहन करू शकले.
– श्रीमती मिथिलेश वेद (वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |