अहिल्यानगरमध्ये ‘एल्.ई.डी.’ पथदिव्यांमुळे महापालिकेच्या वीजदेयकांमध्ये ७२ टक्क्यांची बचत

कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता राबवली मोहीम

अहिल्यानगर – शहर आणि उपनगर यांमध्ये लावण्यात आलेल्या ३२ सहस्र ४५० ‘स्मार्ट एल्.ई.डी.’ पथदिव्यांमुळे महापालिकेच्या वीजदेयकांमध्ये ७२ टक्क्यांची बचत झाली आहे. त्यामुळे प्रतिमास ४५ लाख रुपयांचे वीजदेयक वाचले आहे. हे दिवे लावण्यासाठी महापालिकेने कोणतीही आर्थिक गुंतवणूक केलेली नाही. दिवे बसवणे आणि त्यांची ७ वर्षांपर्यंत देखभाल करण्याचे दायित्व हे ठेकेदार संस्थेचे आहे. वीजदेयकांत जी बचत होईल, त्यातून ८४ टक्के हिस्सा ठेकेदार संस्थेला आणि १६ टक्के हिस्सा महापालिकेला मिळणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे.

‘ई स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स लि.’ या ठेकेदार संस्थेला हे दायित्व दिले आहे. या संस्थेने आतापर्यंत शहरातील २५ सहस्र २२६ पथदिवे काढून त्या जागेवर नवीन ‘एल्.ई.डी.’ दिवे बसवले आहेत.

आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, ज्या भागात खांब नाहीत, तेथे अद्याप दिवे बसवण्यात आलेले नाहीत. लवकरच त्या जागेची पहाणी करून आवश्यक तेथे नवीन ‘एल्.ई.डी.’ दिवे बसवण्यात येतील.