मुंबई – लोअर परळ येथील उड्डाणपुलाखालून वेगाने वळसा घेतांना अक्षय पटेल (वय २८ वर्षे) या सॉफ्टवेअर अभियंत्याने एका महिलेला धडक दिली. या अपघाताने महिलेचा मृत्यू झाला. पूनम खारवा (वय ३६ वर्षे) असे या महिलेचे नाव होते.
३० जुलै या दिवशी सायंकाळी जेवण आणण्यासाठी जात असतांना हा अपघात झाला. अक्षय पटेल याच्याकडे गाडीचे शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) असल्याचे आढळून आले. पूनम खारवा या त्यांच्या ४ अल्पवयीन मुलांसह ‘एल्फिन्स्टन उड्डाणपुलाखाली रहात होत्या. अपघातानंतर अक्षय पटेल आणि त्यांच्या सहकार्याने अपघातग्रस्त पूनम खारवा यांना नायर रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ६ वर्षांपूर्वी पूनम खारवा यांच्या पतीचे निधन झाले. त्या कुर्ला येथील एका चाळीत रहात होत्या. खोलीचे भाडे भरत नसल्यामुळे त्यांना मालकाने बाहेर काढले. या अपघाताप्रकरणी अक्षय पटेल याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.